ricky ponting with rahul dravid
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: टीम इंडियामध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या हेड कोचची (Team India Head Coach)धुरा आता रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) हातात दिली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने विजयी सुरुवात केली आणि मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने(Ricky Ponting) मोठा खुलासा केला आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात त्याला टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर देण्यात आली होती असे त्याने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्य संपर्कात असणारे बरेचजण त्यासाठी उत्सुक होते. पण वर्कलोड असल्याने त्याने ती ऑफर नाकारली असल्याचे म्हटले आहे. ‘द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट’ शी संवास साधताना पाँटिंगने टीम इंडियाच्या हेड कोचच्या ऑफरसंदर्भात खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘मी माझ्या नोकरीच्या वर्षातून 300 दिवस भारतात राहतो. होय, बघा, आयपीएलदरम्यान माझे काही लोकांशी प्रशिक्षकपदसंदर्भात बोलणे झाले होते. ज्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता ते यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. पण वर्कलोड असल्याने ही ऑफर मी नाकारली. मी ऑफर घेतली असती तर मला आयपीएल कोचिंग, चॅनल 7 सारख्या गोष्टी सोडून द्याव्या लागल्या असत्या, जे योग्य नव्हते. पण लोकांना वाटते की तुम्ही या मोठ्या गोष्टी करू शकाल हे चांगले आहे.’ असे मत यावेळी पाँटिंगने यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, कुटुंब असूनही राहुल द्रविडने हे काम करण्यास होकार दिल्याबद्दल रिकी पाँटिंगनेही आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की द्रविडनेही ही ऑफर स्वीकारली. अंडर-19 च्या भूमिकेत तो किती खूश होता, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल समजत नाही पण मला खात्री आहे की त्याला लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी उचलण्यास होकार दिल्याचे मला आश्चर्य वाटते. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाँटिंगने प्रशंसनीय काम केले आहे. त्याच्या अंतर्गत, दिल्लीस्थित फ्रँचायझी 2019 पासून सलग तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. एवढेच नाही तर 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली.