लंडन, 2 जून : बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वात इंग्लंडची टीम केन विलियमसनच्या न्यूझीलंडविरुद्ध (England vs New Zealand) 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होत आहे. इंग्लंडची टीम नवीन कर्णधार आणि नवीन कोच ब्रॅण्डन मॅक्कलम यांच्यासह पहिलाच सामना खेळत आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉससाठी मैदानात इंग्लंडच्या कर्णधाराने जे केलं ते पाहून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत. स्टोक्सने ब्लेझरऐवजी इंग्लंडचा माजी कोच आणि खेळाडू ग्रॅहम थोर्प (Graham Thorpe) यांच्या नावाची जर्सी घातली. थोर्प सध्या आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत. ‘इंग्लंडचे माजी प्रशिक्षक आणि कोच ग्रॅहम थोर्प यांच्या सन्मानासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स थोर्प यांचं नाव आणि नंबर लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरला,’ असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं. टेस्ट मॅचमध्ये टीमचे कर्णधार ब्लेझर घालून टॉससाठी मैदानात येतात, पण स्टोक्सने थोर्पना सन्मान देण्यासाठी ही परंपरा मोडली.
23 दिवसांपासून थोर्प रुग्णालयात ग्रॅहम थोर्प गंभीर आजारी असल्यामुळे 10 मे पासून रुग्णालयात दाखल आहेत. थोर्प इंग्लंडसाठी 100 टेस्ट खेळले, यात त्यांनी 16 शतकं ठोकली. 2005 साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. थोर्प यांनी त्यांच्या कोचिंग करियरची सुरूवात ऑस्ट्रेलियामध्ये केली. यानंतर ते बॅटिंग कोच म्हणून इंग्लंड टीमसोबत होते. ट्रेवर बेलिस आणि क्रिस सिल्व्हरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली थोर्प इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षकही होते. जानेवारी महिन्या ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर थोर्प यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.