australia team
दिल्ली, 20 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान, 1 मार्चला होणाऱ्या तिसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्यानंतर आता आणखी दोन खेळाडु दुखापतीमुळे मायदेशी परतणार आहेत. कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध असणार आहे ही जमेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाला पुढच्या दोन कसोटी सामन्यात अडचणींचा डोंगर आणखी वाढणार आहे. डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हासुद्धा पॅट कमिन्ससोबत मायदेशी परतला आहे. वॉर्नरला दुसऱ्या कसोटीवेळी दुखापत झाली होती तर हेजलवूड हा जुन्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी ८ दिवसांचा वेळ असून पॅट कमिन्स त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या गंभीर आजारपणामुळे तो मायदेशी परतणार आहे. इंदौरमध्ये सराव सुरू करण्याआधी आता ऑस्ट्रेलियन खेळाडुंकडे आणखी काही दिवस शिल्लक असणार आहेत. आता वॉर्नर आणि हेजलवूड हे मायदेशी परतणार असल्यानं ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढले आहे. हेही वाचा : Womens T20 WC : दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, भारताकडे आज शेवटची संधी हेजलवूडला त्याच्या दुखापतीतून सावरायला वेळ लागल्यानतंर तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघात होता. मात्र आता त्याला २ कसोटीनंतर बाहेर पडावं लागत आहे. तर वॉर्नरला दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, एश्टन एगर आणि मॅथ्यू रेनशॉसुद्धा ऑस्ट्रेलियाला परत जाऊ शकतात असं नाइन या वृत्तपत्राने म्हटलं आहे. कॅमरॉन ग्रीन आणि मिशेल स्टार्क हे इंदोरमधील सामना खेळण्यासाठी तयार आहेत. मिशेल स्वेप्सन दुसऱ्या कसोटीआधी त्याच्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतला होता. तो तिसऱ्या कसोटीसाठी इंदौरला पोहोचेल. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही याबाबत खात्री नाही. तो पहिल्या सामन्यातही कसोटी संघात नव्हता.