CSKने शेअर केला धोनीचा व्हिडीओ
चेन्नई, 14 जून : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतपद पटकावलं. यंदाच्या आयपीएल हंगामाच्या आधीपासूनच धोनी आयपीएलमधून रिटायर होणार अशी चर्चा सुरू झाली होती. तर फायनलनंतर बोलताना फिट राहिल्यास पुढच्या हंगामातही मैदानात उतरेन असं धोनीने म्हटलं होतं. धोनीने पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. पण आता चेन्नई सुपर किंग्जने 33 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे चाहत्यांची धडधड वाढली आहे. चेन्नईने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये ओह कॅप्टन, माय कॅप्टन असं म्हटलं आहे. धोनीचा स्टेडियममध्ये जात असलेला हा व्हिडीओ आहे. अर्थात यावर धोनी किंवा चेन्नईने अधिकृतपणे काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहतेसुद्धा संभ्रमात आहेत. आयपीएलच्या 16 व्या हंगामात धोनीला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास झाला. यामुळे तो फलंदाजीलासुद्धा खालच्या क्रमांकावर आला होता. स्पर्धा संपल्यानंतर धोनीने गुडघ्यावर सर्जरीसुद्धा केली. सर्जरी यशस्वी झाली असून दुखापतीतून सावरत असल्याचं म्हटलं जात आहे. शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली पण नो बॉलने घात केला, एका चेंडूत दिल्या 18 धावा
सर्जरीनंतर धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसू शकतो अशी चर्चा आहे. पण चेन्नई सुपर किंग्जने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. काय म्हणाला होता धोनी? धोनीला त्याचा हा शेवटचा हंगाम आहे का असं विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला होता की परिस्थिती पाहिली तर माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्यासाठी हे बोलणं सोपं आहे की मी निरोप घेतोय. पण पुढच्या नऊ महिन्यात कठोर मेहनत करून परतणे आणि त्यानंतर एक हंगाम खेळणं कठीण आहे. शरीराने साथ द्यायला हवी. चेन्नईच्या चाहत्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी मी आणखी एक हंगाम खेळणं हे गिफ्ट असेल. त्यांनी जे प्रेम केलं त्यासाठी मलाही काहीतरी करायला हवं.