मुंबई, 28 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजचे दिग्गज स्पिनर सोनी रामदीन (Sonny Ramadhin) यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. सोनी इंग्लंडमध्ये 1950 साली पहिल्यांदा सीरिज जिंकलेल्या वेस्ट इंडिज टीमचे सदस्य होते. क्रिकेट वेस्ट इंडिजनं त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सोनीच्या नावावर आजही एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांनी 1957 साली झालेल्या टेस्ट मॅचमध्ये एका इनिंगमध्ये सर्वात जास्त बॉल टाकले होते. हा रेकॉर्ड 65 वर्षांनंतरही अबाधित आहे. इंग्लंड विरूद्ध 1950 साली ओल्ड ट्रॅफर्डवर पदार्पण करणाऱ्या सोनीनं 43 टेस्ट मॅच खेळल्या. यामध्ये त्यांनी 28.98 च्या सरासरीनं 158 विकेट्स घेतल्या. ‘वेस्ट इंडिजच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या सोनी रामदीन यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो,’ अशी भावना क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी व्यक्त केली आहे.
रिकी पुढे म्हणाले की, ‘सोनी यांनी वर्ल्ड क्रिकेटमध्ये पदार्पणातच ठसा उमटवला. 1950 च्या दौऱ्यातील त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यांची एल्फ वेलेंटाईन सोबतची स्पिन जोडी चांगलीच हिट होती. या जोडीनं पहिल्यांदा इंग्लंडचा त्यांच्याच देशात पराभव केला.’ IPL 2022 : पंजाब किंग्जचा कॅप्टन ठरला, टीम इंडियातील ‘या’ खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब सोनी रामदीन यांनी वेस्ट इंडिजला इंग्लंडमध्ये मिळेलेल्या पहिल्या टेस्ट विजयात 11 विकेट घेतल्या होत्या. लॉर्ड्सवर ती मॅच झाली होती. वेस्ट इंडिजनं ती सीरिज 3-1 या फरकाने जिंकली. सोनी यांनी 1957 साली इंग्लंड विरूद्ध बर्मिंगहॅममध्ये झालेल्या टेस्टमधील एका इनिंगमध्ये 558 बॉल टाकले. त्यांनी संपूर्ण टेस्टमध्ये 774 बॉल टाकले. एका इनिंगमध्ये आणि एका टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक बॉल टाकण्याचे त्यांचे रेकॉर्ड आजही कायम आहेत. ती टेस्ट पुढे ड्रॉ झाली. सोनी यांनी त्या मॅचमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या.