मुंबई, 21 फेब्रुवारी : टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋद्धीमान साहानं (Wriddhiman Saha) टीममधून वगळल्यानंतर हेड कोच राहुल द्रविडवर (Rahul Dravid) टीका केली होती. ‘टीम इंडियाच्या निवडीसाठी आपला विचार होणार नाही, त्यामुळे निवृत्त होण्याचा विचार करावा,’ असा सल्ला द्रविडने दिल्याचा दावा साहाने केला होता. साहाच्या या टीकेला राहुल द्रविडने उत्तर दिलं आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यानंतर द्रविडनं साहाला उत्तर दिलं आहे. द्रविड यावेळी म्हणाला की, ‘मला या प्रकरणाचं अजिबात वाईट वाटत नाही. भारतीय क्रिकेटसाठी साहाच्या योगदानाबाबत माझ्या मनात अत्यंत आदर आहे. याच भावनेतून मी त्याच्याशी चर्चा केली. त्याला प्रामाणिकपणे सर्व स्पष्ट करण्याची गरज होती, असं मला वाटतं. त्याला हे सर्व मीडियातून समाजावं असं मला वाटत नव्हतं. मी या प्रकराची चर्चा माझ्या खेळाडूंशी करतो. माझं प्रत्येक बोलणं त्यांना आवडेल किंवा ते त्याच्याशी सहमत असावे, असा माझा आग्रह नाही. पण, याचा अर्थ तुम्ही असे बोलणारच नाही असा होत नाही. आम्ही प्लेईंग 11 ची निवड करताना ज्या खेळाडूंची निवड झाली नाही, त्यांना कल्पना देतो. खेळाडूंना वाईट वाटणे हे स्वाभाविक आहे. माझ्या टीममध्ये प्रत्येक गोष्ट स्पष्ट असावी, असं माझं मत आहे.’ राहुल द्रविड पुढे म्हणाला की, ‘यावर्षी काही मोजक्याच टेस्ट होणार आहेत. ऋषभ पंतनं स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्ही एका तरूण विकेट किपरला तयार करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे साहाचे योगदान कमी होत नाही. मी स्वत:हून त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला हे सर्व सांगितलं, या गोष्टीशी साहा भविष्यात कधीतरी सन्मान करेल.’ असे द्रविडने यावेळी स्पष्ट केले. ऋद्धीमान साहाला पत्रकारानं दिली धमकी! क्रिकेटपटूनं शेअर केला स्क्रीनशॉट सिनिअर खेळाडूंना वगळले भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिजमधून ऋद्धीमान साहासह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या 4 सिनिअर खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ‘आपण या सर्वांना श्रीलंका दौऱ्यात निवड होणार नाही, याची कल्पना दिली आहे.त्यांच्यासाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत. ते रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून पुनरागमन करू शकतात,’ अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दिली होती. त्यानंतर साहाने द्रविडवर टीका केली होती.