कोलकाता,19 डिसेंबर: इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 सत्रासाठी कोलकाता येथे लिलाव सुरू असताना दुसरीकडे किंग्स इलेवन पंजाबने मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज के एल राहुल यांच्याकडे किंग्स इलेवन पंजाबचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. राहुल याची किंग्स इलेवन पंजाबच्या कर्णधारपदी (कप्तान) नियुक्ती करण्यात आली आहे. किंग्स इलेवन पंजाबचे सहमालिक नेस वाडिया यांनी सांगितले की, ‘इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 सत्रासाठी राहुल याच्याकडे संघाचे नेतृत्व दिल्याचा मोठा आनंद झाला आहे. राहुल याला मागील काही वर्षे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याने सर्व अडचणींवर मात करून शानदार वापसी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राहुल याला किंग्स इलेवन पंजाबने 2018 च्या सत्रात 11 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. 2019 च्या सत्रात पंजाब संघाचे नेतृत्व आर अश्विनने केले होते. मात्र, अश्विन दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्यानंतर राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. राहुल सलामी फलंदाज असून विकेटकीपरची भूमिका देखील तोच पार पाडणार आहे. लिलावात परदेशी खेळाडूंची चांदी आयपीएल 2020 चा लिलाव संपला. पॅट कमिन्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्सला यावर्षीची सर्वात जास्त बोली लावण्यात आली. कमिन्सला 15.50 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. पंजाब संघाने मॅक्सवेलला 10.75 कोटींना विकत घेतले. मॅक्सवेल या पूर्वीही किंग्स इलेवन पंजाबमध्ये होता. याचबरोबर हेटमायरला 7.75 कोटींना विकत घेण्यात आले. त्याचबरोबर युवा खेळाडूंनाही चांगल्या रकमेत खरेदी करण्यात आले. भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले. तर, विजय हजारे करंडकमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर राजस्थान संघानं 2.40 कोटींची बोली लावली. तर, प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवणाऱ्या विराट सिंहवर हैदराबादने 1.90 कोटींची बोली लावली.