मुंबई, 18 डिसेंबर: ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या मैदानात अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. त्यामधील काही रेकॉर्ड पार करणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एक स्वप्नच आहे. सचिनचे मोठेपण हे केवळ त्याच्या मैदानातील कामगिरीवर अवलंबून नाही. त्यानं मैदानाबाहेरही अनेक अभिमानस्पद कामं केली आहेत. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी सचिन नेहमीच पुढे असतो. सचिनच्या जवळच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. ट्रॅफिक पोलिसाच्या तत्परतेमुळेच त्याचा जीव वाचला. त्याबद्दल सचिननं त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेऊन त्याचे आभार मानले. सचिन फक्त एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून जीवदान देणाऱ्या पोलिसाचे आभार मानले आहेत. सचिननं ट्विटरवर ‘त्या’ ट्रॅफिक पोलिसाची प्रशंसा करणारा एक लेख शेअर केला आहे. ‘या व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे…’ असे शिर्षक सचिननं या लेखाला दिले आहे. त्यामध्ये सचिन म्हणतो, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या व्यक्तीचा गंभीर अपघात झाला. देवाच्या कृपेने आता तो बरा आहे. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे. ट्रॅफिक पोलिसाने समयसूचकता दाखवली. त्याने तातडीने जखमी व्यक्तीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला आणखी त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मी त्या ट्रॅफिक पोलिसाला भेटलो. या सर्व मदतीबद्दल त्याचे आभार मानले.’
सचिननं पुढे लिहलं आहे की, ‘आपल्या सर्व बाजूंना अशी अनेक मंडळी आहेत, जी दुसऱ्यांना मदत करतात. या व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे. इतरांची सेवा करणाऱ्या या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी काही वेळ काढला पाहिजे.’ सचिनने यावेळी ट्रॅफिक पोलिसांची त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली. तसंच सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या खेळाडूंनी मृत्यू जवळून पाहिला, मैदानातला भीतीदायक VIDEO