मुंबई, 1 जुलै: पाकिस्तानचा माजी कॅप्टन युनूस खाननं (Younis Khan) शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) एक गंभीर आरोप केला आहे. शाहिद आफ्रिदीनं कॅप्टन होण्यासाठी 2009 मध्ये काही ज्येष्ठ खेळाडूंच्या मदतीनं माझ्या विरुद्ध बंड केले होते, असा आरोप युनूसनं केला आहे. युनूसनं काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बॅटींग प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटमधील एका जुन्या घटनेबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. युनूस खानला 2009 साली खेळाडूंच्या नाराजीमुळे कॅप्टनपद सोडावे लागले होते. माझ्या कार्यपद्धतीवर खेळाडू नाराज नव्हते. ते नाराज असते तर त्यांनी त्याबाबत माझ्याशी चर्चा केली असती, असा दावा युनूसनं एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. “काही खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) तेव्हाचे अध्यक्ष एजाज बट यांची भेट घेतली. यामध्ये शाहिद आफ्रिदीचाही समावेश होता. त्या भेटीत त्यांनी कॅप्टन बदलण्याची मागणी केली. आफ्रिदीला कॅप्टन होण्याची महत्त्वकांक्षा होती. त्यामुळेच त्याने ही मागणी केली, ’’ असा आरोप युनूसनं केला आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी पीसीबी अध्यक्षांककडे केलेल्या मागणीनंतर युनूसची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतक टेस्ट टीमचा कॅप्टन मिसबाह उल हक तर लिमिटेड ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन शाहिद आफ्रिदी बनला. पाकिस्तान क्रिकेटमधील चार वर्ष आपण एकट्यानं रुममध्ये घालवली. या काळात मी फक्त क्रिकेटवर फोकस केले होते, असेही युनूसने स्पष्ट केले. शफाली वर्मामुळे आली धोनीची आठवण! आऊट झाल्यानंतर नवा वाद, पाहा VIDEO ‘काही जणांनी विश्वासघात केला’ फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) बरोबर झालेल्या वादामुळे युनूसने बॅटींग प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे. युनूसनं मात्र तो दावा फेटाळला आहे. माझ्या राजीनाम्याचं कारण वेगळं आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (PCB) झालेल्या करारानुसार मला आणखी सहा महिने या विषयावर बोलता येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट आणि पीसीबीचे हिताचा विचार करत मी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पीसीबीतील काही मंडळींनी अंतर्गत गोष्टी जाहीर करुन माझा विश्वासघात केला, तसंच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा दावा युनूसनं केला आहे.