मुंबई, 1 जुलै: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा यापूर्वी स्थगित करावी लागली होती. आता स्पर्धेतील उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होतील. आयपीएल स्पर्धेसाठी एप्रिल आणि मे महिन्यात विशेष जागा असल्यानं सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता स्पर्धा सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात होणार असल्यानं विदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इंग्लंड बोर्डानं यापूर्वीच त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवलीय. न्यूझीलंडपाठोपाठ आणखी एका देशाच्या क्रिकेटपटूंनी भारतीय फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याने दिलेल्या इशाऱ्यानंततरही बहुतेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय टीमकडून न खेळता आयपीएल स्पर्धेत सहभागी झाल्यास आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या टीममध्ये निवड होण्याची खात्री नाही, असा इशारा फिंचनं दिला होता. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये होणार आहे. ‘क्रिकबझ’ च्या वृत्तानुसार पॅट कमिन्ससोडून बहुतेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय टीमसाठी आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉईनिस, केन रिचर्डसन आणि डॅनियल सॅम्स या खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. आता आगामी टी20 वर्ल्ड कप देखील यूएईमध्ये होणार आहे. त्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे. भारताविरुद्ध चार बॉलमध्ये 4 विकेट्स, शतकही झळकावले तरी टीममध्ये संधी नाही न्यूझीलंडचे खेळाडू उपलब्ध न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळण्यासाठी उपलब्ध असतील. न्यूझीलंडचे केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, जिमी नीशम, मिचेल सँटनर आणि टीम सेफर्ट हे सात दिग्गज खेळाडू वेगवेगळ्या आयपीएल टीमचे सदस्य आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फारसे व्यस्त नाही. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अडचण नाही. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी म्हणून बीसीसीआयची त्यांच्या क्रिकेट बोर्डाशी बोलणी सुरू आहे.