मुंबई, 17 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे मालिका 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत विराट केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये खेळताना दिसेल. दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्यापूर्वी विराटला वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्याने दोन दिवसांपूर्वी टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचाही राजीनामा दिला आहे. विराट कोहलीच्या कारकिर्दीमधील नवा टप्पा आता सुरू होत आहे. हा टप्पा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी त्याला सल्ला दिला आहे. कपिल देव यांनी ‘मिड-डे’ शी बोलताना सांगितले की, ‘मी विराटच्या निर्णयाचे स्वागत करतो. टी20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर तो वाईट कालखंडातून जात होता. तो गेल्या काही दिवसांमध्ये तणावातही होता. त्यामुळे मुक्तपणे खेळण्यासाठी कॅप्टनसी सोडणे हा एक पर्याय होता.’ विराटला महत्त्वाचा सल्ला कपिल देव यांनी यावेळी विराटला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘सुनील गावसकर माझ्या कॅप्टनसीमध्ये खेळले. मी श्रीकांत आणि मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या कॅप्टनसीमध्ये खेळलो. मला कोणताही इगो नव्हता. विराटने देखील त्याचा इगो सोडावा लागेल. त्याला तरूण क्रिकेटपटूंच्या मार्गदर्शनाखाली खेळावे लागेल. विराटनं नवा कॅप्टन आणि नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करायला हवे. एक बॅटर म्हणून त्याला आपल्याला गमवाता येणार नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले. एका फोन कॉलमध्ये झाला सर्वात मोठा निर्णय, वाचा राजीनाम्यापूर्वी विराट-गांगुलीमध्ये काय झाली चर्चा टीम इंडियाने टेस्ट टीमच्या कॅप्टनसीबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. विराटनंतर वन-डे आणि टी20 टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. टेस्ट टीमच्या कॅप्टनपदासाठी देखी रोहित शर्माचे नाव सर्वात आघाडीवर आहे.