मुंबई, 5 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा हेड कोच जस्टीन लँगरने (Justin Langer) त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांशी लँगरची 8 तास दीर्घ बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासांमध्येच त्याने राजीनामा दिला आहे. लँगरचा प्रशिक्षक म्हणून कालावधी जून महिन्यापर्यंत होता. तसेच त्याला मुदतवाढ मिळेल अशीही चर्चा होती. पण, तसं प्रत्यक्षात घडलं नाही. लँगरनं मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. जस्टीन लँगर गेल्या चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन टीमचा हेड कोच होता. त्याच्याबरोबर झालेल्या गोपनीय चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. याबाबत लवकरच पुन्हा एकदा बैठक होईल अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी दिली होती. त्यानंतर लगेच लँगरनं राजीनामा दिला आहे.
जस्टीन लँगरच्या मॅनेजमेंट कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘आमचे ग्राहक जस्टीन लँगर यांनी आज सकाळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा काल संध्याकाळी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या बैठकीनंतर देण्यात आला आहे. त्याची तत्काळ पद्धतीनं अंमलबजावणी होईल.’ असे कंपनीने जाहीर केले. अफगाणिस्तान विरूद्ध निघाला ऑस्ट्रेलियाचा घाम, भारतीय खेळाडूमुळे वाचली लाज दमदार कामगिरीनंतर राजीनामा जस्टीन लँगरच्या कारकिर्दीतील मागील काही महिने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी जबरदस्त ठरले. ऑस्ट्रेलियानं मागच्या वर्षी पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर इंग्लंडचा अॅशेस मालिकेत 4-0 असा एकतर्फी पराभव केला. मैदानातील या मोठ्या यशानंतरही ऑस्ट्रेलियन टीममधील काही खेळाडू त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.