मुंबई, 9 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची T20 लीग आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्यास मदत होते. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याची अनेकांची इच्छा असते. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये 15 देशांमधील 590 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याचवेळी काही स्टार खेळाडूंनी यामधून माघार देखील घेतली आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आगामी आयपीएल लिलावात सहभागी होणार नाही. आयपीएल 2018 साठी झालेल्या लिलावातील तो सर्वात महागडा खेळाडू होता. स्टोक्सला त्यावेळी राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 12.50 कोटींमध्ये खरेदी केले होते. आयपीएलमधील प्रमुख खेळाडू असलेल्या स्टोक्सच्या माघारीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘डेली मिरर’ मध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये बेन स्टोक्सनं आयपीएलमध्ये न खेळण्याचं कारण सांगितलं आहे. ‘माझी प्राथमिकता टेस्ट क्रिकेट आहे. मला जो रूटसोबत काम करायचं आहे. आमच्या टीमला पुढे नेण्यासाठी रूट हा सर्वात चांगला क्रिकेटपटू आहे. मी आयपीएलमध्ये खेळण्याबाबत बराच विचार केला. त्यावेळी हा प्रश्न पैशांचा नाही तर माझी प्राथमिकता निश्चित करण्याचा आहे, असे मला वाटले. मला सध्या टेस्ट टीम चांगली करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या सिझनमध्ये अनेक इंग्लिश कौंटी सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मला याची मदत होणार आहे.’ असे स्टोक्सने स्पष्ट केले आहे. IND vs WI, 2nd ODI Dream11 Prediction : ‘या’ 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा 0-4 असा पराभव झाला होता. या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये जोरदार पडसाद उमटत आहेत. अॅशेस सीरिजमध्ये मोठा पराभव झाल्याचे पडसाद इंग्लंड क्रिकेटमध्ये (England Cricket) उमटत आहेत. हेड कोच ख्रिस सिल्वरवूड, बॅटींग कोच ग्रॅहम थोर्पे आणि क्रिकेट डायरेक्टर एशले जाईल्स यांची पदावरून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी (England vs West Indies) 3 दिग्गजांना टीममधून वगळण्यात आले आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोस बटलर या तीन दिग्गजांना इंग्लंड टीममधून वगळण्यात आले आहे.