मुंबई, 22 जानेवारी : आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनची (IPL 2022) तयारी सुरू आहे. या सिझनपूर्वी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यापैकी 49 जणांनी 2 कोटी रूपयांच्या सर्वाधिक बेस प्राईजसाठी नोंदणी केली आहे. जगभरातील क्रिकेटपटूंची आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असते. यावर्षीच्या यादीमधूनही ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. त्याचवेळी या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही. इंग्लंडच्या काही प्रमुख क्रिकेटपटूंनी या स्पर्धेतून माघार घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यामध्ये जो रूट (टेस्ट क्रिकेटवर फोकस), बेन स्टोक्स (फिट राहण्यासाठी विश्रांती) आणि जोफ्रा आर्चर (दुखापत) या खेळाडूंचा समावेश आहे. या तीन्ही खेळाडूंचा या यादीत समावेश नाही. त्याचबरोबर आणखी एका दिग्गज खेळाडूनं यंदा नाव न नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. युनिव्हर्स बॉस आणि आयपीएल स्पर्धेचा मोठा सुपरस्टार ख्रिस गेलनं (Chris Gayle) आगामी लिलावासाठी नाव नोंदवलेलं नाही. गेल सध्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून निरोपाची मॅच खेळण्याची संधी मिळावी अशी त्याला अपेक्षा आहे. त्यामुळे त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 Mega Auction : पहिली यादी उघड, ‘या’ खेळाडूंची आहे सर्वात जास्त किंमत! ख्रिस गेलचा आयपीएल रेकॉर्ड ख्रिस गेल हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या टीमकडून खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये गेल सातव्या क्रमांकावर आहे. त्याने 142 मॅचमध्ये 39.72 च्या सरासरीनं 4965 रन केले आहेत. त्याने 148.96 च्या स्ट्राईक रेटनं हे रन केले असून यामध्ये 6 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेलनं आयपीएलमध्ये 404 फोर आणि 357 सिक्सची बरसात केली आहे.