मुंबई, 11 एप्रिल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीच्या (ICC) बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी तयार केलेला चार देशांच्या टी20 मालिकेचा प्रस्ताव आयसीसीनं एकमतानं फेटाळला आहे. आयसीसीनं हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्या तटस्थ देशांमध्ये मालिका होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. राजा यांनी आयसीसीच्या बैठकीत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार देशांच्या वार्षिक टी20 क्रिकेटचा प्रस्ताव सादर केला होता. ही सीरिज झाली तर आयसीसीला यामधून 75 कोटी डॉलर (जवळपास 57 अब्ज रूपये) महसूल मिळणार आहे. त्याचा मोठा भाग या चार देशांना दिला जाऊ शकतो. सध्या भारतीय टीम पाकिस्तान विरूद्ध फक्त आशिया कप आणि वर्ल्ड कप या स्पर्धेमध्येच खेळते. दोन्ही देशांमधील अन्य सर्व सीरिज बंद आहेत. आयसीसीनंही त्यांच्या सदस्यांना 3 किंवा जास्त देशांचा सहभाग असलेली स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिलेली नाही.या स्पर्धांमुळे टी20 वर्ल्ड कप किंवा वन-डे वर्ल्ड कप या आयसीसीच्या स्पर्धांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. हे धोरण या बैठकीतही कायम ठेवत राजा यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. BCCI चा दबदबा वाढला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आयसीसी क्रिकेट समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर हे पद भारताला मिळावं यासाठी बीसीसाआय प्रयत्नशील आहे. जय शहा यांची मुख्य समितीमध्ये नियुक्ती झाल्यानं या पदासाठी रणनीती तयार करणे बीसीसीआयला सोपं जाणार आहे. IPL 2022 : लखनऊनं केली ‘गंभीर’ चूक, राहुलच्या एका निर्णयामुळे टीम पराभूत आयसीसीच्या एका सदस्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, ‘बाकर्ले यांना मुदतवाढ देण्याच्या विषयावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. ते त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यानंचर नोव्हेंबर महिन्यात नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.