मुंबई, 22 डिसेंबर : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. दोन्ही देशांच्या टेस्ट सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. यजमान टीमचा भारताविरुद्ध आफ्रिकेतील रेकॉर्ड दमदार आहे. त्यांनी आजवर झालेल्या सर्व टेस्ट सीरिज जिंकल्या आहेत. त्यानंतरही आगामी टेस्ट सीरिजपूर्वी आफ्रिकेची टीम (South Africa Cricket Team) काळजीत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन डीन एल्गर (Dean Elgar) याने ही भीती बोलून दाखवली आहे. एल्गरला भारतीय क्रिकेट टीममधील अव्वल बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) धास्ती वाटत आहे. बुमराहनं मागील दक्षिण आफ्रिका सीरिजच्या दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता तो जगातील सर्वात धोकादायक बॉलरपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननं सांगितलं की, ’ बुमराह वर्ल्ड क्लास बॉलर आहे. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचा तो फायदा मोठा फायदा उठवू शकतो. आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर लक्ष केंद्रीत केलेलं नाही. भारत एक मजबूत टीम आहे. विदेशी दौऱ्यातील त्यांच्या बॉलिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. आम्हाला ज्या फास्ट बॉलिंग अटॅकचा सामना करायचा आहे, त्यांच्याविरुद्ध खेळताना आम्हाला सावध राहावं लागेल.’ जोफ्रा आर्चरचे झाले आणखी एक ऑपरेशन, वाचा IPL स्पर्धेत खेळणार की नाही? बुमराहनं 2018 साली झालेल्या दक्षिण आफ्रिका सीरिजमधील 3 टेस्टमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी देखील त्याने त्या दौऱ्यात केली होती. बुमराहनं मागील तीन वर्षात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट क्रिकेट खेळले आहे. त्याच्या अनुभवात आणखी भर पडलीय. त्याचबरोबर टी20 वर्ल्ड कपनंतर बुमराहला न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती. ‘ब्रेक के बाद’ धमाका करण्यासाठी बुमराह सज्ज आहे. त्यामुळेच आफ्रिकेच्या कॅप्टननं बुमराह सर्वात मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केले आहे.