कानपूर, 28 नोव्हेंबर: टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेलनं (Axar Patel) फक्त 4 टेस्टमध्ये पाचव्यांदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अक्षरनं 34 ओव्हरमध्ये 62 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडची पहिली इनिंग 296 रनवर आटोपली आणि टीम इंडियाला 49 रनची आघाडी मिळाली. गुजरातचा अक्षर पटेल भारतीय क्रिकेटमध्ये ‘बापू’ या नावानं प्रसिद्ध आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) त्याच्याशी चर्चा केली. बीसीसीआयनं (BCCI) या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी अश्विननं बॉलिंगमधील एका विषयावर अक्षरचा सल्ला मागितला आहे. अश्विन यावेळी म्हणाला की, ‘तुझ्या बॉलिंगमधील एक गोष्ट मला आवडली. मला त्याबाबत विचारायचं आहे. तू रॉस टेलरसाठी जशी फिल्डिंग सेट केली होतीस तसाच बॉल वळाला. मी बॉल वळवतो तेव्हा तो बॅटला न लागता निघून जातो. पण तू टाकलेला बॉल बॅटला लागतो. हे कसं होतं, ते मला तुझ्याकडून शिकायचं आहे. मी टाकलेला बॉल देखील बॅटला लागून भरतच्या हातामध्ये जावा अशी माझी इच्छा आहे.’
अक्षरनं अश्विनच्या या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिले. ‘तू बॉल खूप जास्त स्पिन करतोस त्यामुळे तो बॅटच्या जवळून जातो. माझा बॉल जास्त वळत नाही, त्यामुळे तो बॅटला लागतो. तू बॉल थोडा कमी वळव.’ असा सल्ला अक्षरनं अश्विनला हसत-हसत दिला. IND vs NZ: अक्षर पटेलचा न्यूझीलंडला ‘पंच’, दमदार कामगिरीनंतर मानले आयुष्यातील हिरोचे आभार अक्षर पटेलने 4 टेस्टच्या 7 इनिंगमध्ये 10.87 ची सरासरी आणि 30.3 च्या स्ट्राईक रेटने 32 विकेट घेतल्या. यात 5 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि मॅचमध्ये एकदा 10 विकेटचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमधून पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये अक्षर पटेलने धमाका केला. इंग्लंडविरुद्धच्या 3 टेस्टमध्ये त्याने तब्बल 27 विकेट घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्टमध्येही त्यानं ही कामगिरी सुरू ठेवली आहे.