पुणे, 23 मार्च: पुण्याजवळच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारतविरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) पहिला वन-डे सामना खेळावला जाणार आहे. टी-20 मालिका (India Won T-20 Series) जिंकल्यानंतर भारतीय संघाचं मनोबल उचावलं आहे तर इंग्लंडचा संघ वन-डे मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. या वर्षाच्या शेवटी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा होईपर्यंत आता या वर्षी कोणतीही वन-डे मोठी मालिका खेळवली जाणार नाही त्यामुळे या मालिकेला महत्त्व आहे. मंगळवारी (23 मार्च) रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ही मॅच सुरू होणार आहे. फॉर्मात असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ऑगस्ट 2019 मध्ये आपलं 43 वं वन-डे शतक वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात झळकावलं होतं. त्यामुळे या सामन्यात तो शतक लगावेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. जोफ्रा आर्चर आणि जो रूट वन-डेत खेळू शकणार नसल्याने इंग्लंडला हा सामना थोडा जड जाऊ शकतो. हवामानाचा अंदाज- मंगळवारी दिवसभर हवामान उष्ण राहील असा अंदाज असून तापमान 25 टक्के आर्द्रतेसह ते 35 डिग्री सेल्सियस असेल असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. पाऊस होण्याची शक्यता वाटत नाही पण दुपारी हवामान ढगाळ राहू शकेल. (हे वाचा- ‘खेळाडूला फेल होताना पाहणं लोकांना आवडतं’, KL वर होणाऱ्या टीकेनंतर संतापला विराट ) पिच रिपोर्ट- पुण्याचं पिच हे फलंदाजांना अनुकुल आहे. वेगवान गोलंदाजांनाही पिच हितकारक ठरू शकतं. जशी-जशी मॅच पुढे जाईल तसतसं फिरकीपटूंची फिरकी प्रभावी ठरायला लागेल. पण हे पिच पूर्णपणे फलंदाजांची मदत करणारंच आहे. या मैदानावर झालेल्या एकूण सामन्यांपैकी निम्मे सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानेच जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक कोण जिंकतो याचा सामन्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही असं मानलं जातंय. (हे वाचा- टोकियो ऑलिंपिकसाठी मेहनत घेणाऱ्या खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, डोक्यावर कोसळली वीज ) पुण्यातल्या या स्टेडियममध्ये वन-डेतील सर्वोच्च धावसंख्या करण्याचं रेकॉर्ड भारताच्या नावेच आहे. 15 जानेवारी 2017 ला भारताने 7 बाद 356 धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीने 122 तर पुण्याच्या केदार जाधवने 120 धावा केल्या होत्या. कोरोना महामारी सुरू असल्याने सर्व काळजी घेतली जात असून, प्रेक्षकांना प्रत्यक्ष सामना पाहता येणार नाही. त्यांना तो टीव्हीवरच पाहता येईल. जरी सामना प्रत्यक्ष पाहता आला नाही तरीही पुण्यातील प्रेक्षक आणि देशभरातील प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं असल्यामुळे आज काही विशेष बघायला मिळेल असा विश्वास क्रिकेटप्रेमींना आहे.