चेन्नई, 6 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व होतं. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) पहिल्या दिवशी शतक झळकावलं. त्याच्या शतकी खेळीनं भारतीय बॉलर्सची चांगलीच परीक्षा घेतली. भारतीय टीमसाठी कंटाळवाण्या ठरलेल्या या दिवसात ऋषभ पंतमुळे (Rishabh Pant) काही हलके क्षण आले. जो रुट आणि डॉम सिबले यांनी भारतीय बॉलर्सच्या संयमाची चांगलीच परीक्षा पाहिली. या जोडीनं दुसरं सत्र सावधपणे खेळून काढलं. त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये त्यांनी वेगानं रन केले. त्यांच्या भक्कम खेळामुळे भारतीय बॉलर्सनं काही चुकाही केल्या. या सर्व कसोटीच्या प्रसंगात ऋषभ पंतनं स्टंपच्या मागून भारतीय खेळाडूंचं मनोरंजन केलं.
पंतनं केली कविता टीम इंडियाचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) 70 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. त्यावेळी डॉब सिबले त्याचा बॉल बचावात्मक पद्धतीनं खेळत होता. त्यावेळी स्टंपच्या मागून पंतचा आवाज ऐकू आला. “माझं नाव आहे वॉशिंग्टन आणि मला जायचं आहे डीसी’ पंतची ही मजेशीर कविता स्टंप माईकमध्ये कैद झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘स्पाडयर मॅन- स्पाडयर मॅन’ या गाण्यानंतर पंतचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.
जो रुटचं सलग तिसरं शतक जो रुटचं शतक हे पहिल्या दिवसाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. रुटनं त्याच्या करियरमधील 20 वं शतक 164 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं पूर्ण केलं. रुटनं दिवसाच्या शेवटच्या सत्रात शतक केलं. रुटनं शतकानंतर आणखी वेगानं रन जमवले. त्यानं आर. अश्विनला एक सिक्स देखील खेचला. रुटची ही शंभरावी टेस्ट आहे. शंभराव्या टेस्टमध्ये शतक करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील नववा तर इंग्लंडचा तिसरा बॅट्समन आहे. इंग्लंडच्या कॅप्टनसाठी 2021 हे वर्ष चांगलंच लाभदायी ठरलं आहे. त्यानं या वर्षातील सलग तिसऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे.