मुंबई, 3 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेमुळे अनेक तरुण खेळाडूंचं आयुष्य बदललं आहे. क्रिकेटमधील कौशल्याच्या जोरावर या खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळाली. त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याचबरोबर आयपीएल फ्रँचायझीकडून चांगली रक्कमही मिळाली. त्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं. राजस्थानचा 20 वर्षांचा लेग स्पिनर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) हा यापैकी एक आहे. एकेकाळी जोधपूरमध्ये मजूरी करणाऱ्या रवी बिश्नोईचा आयपीएल स्टार होण्यापर्यंतचा प्रवास हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. पंजाब किंग्स (Punjab Kings) या आयपीएल टीमचा मुख्य स्पिन असलेल्या रवी बिश्नोईनं एका (YouTube) चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचा आजवरचा प्रवास उलगडून सांगितला आहे. त्याच्या कुटुंबातील एकही खेळाडू हा क्रिकेटशी संबंधीत नव्हता. त्याच्या घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला कोणत्याही क्रिकेट क्लबमध्ये ट्रेनिंग करता आली नाही. अडचणी अनेक होत्या पण बिश्नोईला क्रिकेटचाच ध्याय होता. याच ध्यासामुळे आज तो इथपर्यंत पोहचला आहे. पिच तयार करण्यासाठी मजूरी केली सुरुवातीच्या काळात आलेलं अपयश हाच आजच्या यशाचा मुख्य भाग आहे, असं रवी बिश्नोईनं सांगितलं. रवीनं जोधपूरमध्ये कोच प्रद्योत सिंग राठोड आणि शाहरुख पठाीण यांच्यासोबत एक क्रिकेट अकादमी सुरु केली होती. पण ती चालवण्याठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सिमेंटचे पोते आणि विटांचे टोपले देखील उचलले आहेत, अशी आठवण त्यानं सांगितली. बारावीमध्ये असताना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमच्या ट्रायलमध्ये सहभागी झालो होते, त्यावेळी आपली निवड झाली नाही. या अपयशानंतरही निराश न होता प्रयत्न सुरु ठेवल्याचं बिश्नोईनं सांगितलं. राहुल आणि कुंबळेनं आत्मविश्वास वाढवला बिश्नोई मागच्या वर्षी पंजाबच्या टीमकडून पहिल्यांदा आयपीएल खेळला. त्यावेळी कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी माझा आत्मविश्वास वाढवल्याचं बिश्नोईनं स्पष्ट केलं. कॅप्टन राहुलनं मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. पंजाबचे कोच अनिल कुंबळे आणि अंडर 19 टीमचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिलेल्या टीप्स देखील महत्त्वाच्या ठरल्याचं बिश्नोई मान्य करतो. ( वाचा : IPL 2021 : मोठी बातमी! वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ) बिश्नोईनं नेट्समध्ये ख्रिस गेल आणि निकोलस पुरन या दिग्गज बॉलर्सना बॉलिंग केली आहे. त्यांना बॉलिंग केल्यानंतर मैदानात कोणत्याही खेळाडूला रोखू शकतो हा आत्मविश्वास त्यानं व्यक्त केला आहे. रवी बिश्नोईनं मागील आयपीएलमध्ये 14 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या होत्या. या सिझनमध्ये पंजाब किंग्सची पहिली मॅच 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईत होणार आहे.