मुंबई, 1 डिसेंबर : टीम इंडिया (Team India) या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट टीम 3 टेस्ट, 3 वन-डे आणि 4 टी20 सामने खेळणार आहे. भारतीय टीमचा हा दौरा संकटात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनची (Omicron) दहशत आहे. त्यामुळे संपूर्ण जग काळजीमध्ये आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेला जाणारी विमानं रद्द केली आहेत. नागरिकांना या देशात प्रवासासाठी जाऊ नये, अशी सूचनाही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीनं सांगितलं की, ‘सध्या दक्षिण आफ्रिका दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी अद्याप वेळ आहे. पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे. या विषयावर आम्ही विचार करू. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा ही बीसीसीआयची नेहमीच पहिली प्राथमिकता आहे. येत्या काही दिवसांमध्ये काय-काय होते ते आम्ही पाहणार आहोत.’ दक्षिण आफ्रिका क्रिकेट सीरिजसाठी आग्रही दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर त्यांना संपूर्ण सुरक्षित अशा बायो-बबलमध्ये ठेवण्यात येईल असं आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतरही इंडिया A टीमचा नियोजित दौरा वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेनं या निर्णयाची देखील प्रशंसा केली आहे. IPL 2022: धोनीचा पगार झाला कमी, जडेजासह 6 जणांना मिळणार माहीपेक्षा जास्त पैसे! दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर फरहान बहारदिनने (Farhaan Behardien) भारताने हा दौरा रद्द करू नये म्हणून विनंती केली आहे. हा दौरा दक्षिण आफ्रिकेच्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचा आहे,कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे भारतीय टीमचा पुढच्या महिन्यातला दौरा रद्द होणार नाही, अशी आशा आहे असं ट्विट बहरादिननं काही दिवसांपूर्वी केले होते.