मुंबई, 5 फेब्रुवारी: टीम इंडियाचे माजी हेड कोच अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 2017 साली त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो एक वादग्रस्त अध्याय आहे. विराट कोहली (Virat Kohli) बरोबर झालेल्या मतभेदामुळे कुंबळेनं पद सोडलं असं मानलं जातं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. बीसीसीआयचे माजी मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी (Ratnakar Setty) यांनी त्यांच्या On Board: Test.Trial.Triumph, My years in BCCI पुस्तकात टीम इंडियाचे विजय, पराभव, ड्रेसिंग रूममधील वातावरण तसेच अनिल कुंबळे यांनी पद सोडल्याची घटना या विषयावर पडद्यामागची गोष्ट सांगितली आहे. या पुस्तकात त्यांनी अनिल कुंबळे यांना एका वर्षात पद का सोडावे लागले? याची तपशीलवार माहिती दिली आहे. पडद्यामागे काय घडले? रत्नाकर शेट्टी यांनी या पुस्तकात लिहिले आहे कि, ‘मी मे 2017 मध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल मॅचच्या एक दिवस आधी वानखेडे स्टेडियममध्ये वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना भेटलो. त्यावेळी डॉ. श्रीधर यांनी आपल्याला कोच पदासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती वीरूनं (वीरेंद्र सेहवाग) दिली. ते ऐकल्यानंतर मला धक्का बसला. त्यानंतर काही दिवसांनी मी आयपीएल फायनलसाठी हैदराबादमध्ये गेलो होतो. फायनल मॅचपूर्वी COA (Committee of Administrators) बैठक झाली. त्या बैठकीला अनिल कुंबळे आणि कॅप्टन विराट कोहलीला भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीवर प्रेझेंटेशन द्यायचे होते. विनोद राय आणि डायना एडुल्जी हे प्रशासकीय समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला कुंबळे प्रत्यक्ष तर विराट व्हर्च्यूली उपस्थित राहणार होता. ही बैठक सुरू होण्यापूर्वी विनोद राय यांनी मला 2016 साली टीम इंडियाचा कोच नियुक्त करण्यासाठी बीसीसीआयनं राबवलेल्या प्रक्रियेबाबत विचारले. त्याचबरोबर ही प्रक्रिया पुन्हा एकदा पार पाडावी लागेल असे सांगितले. राय यांनी भर बैठकीत कुंबळेच्या उपस्थितीमध्ये हे सांगितल्यानं मला धक्का बसला. मला या बैठकीच्या काही दिवस आधी सेहवागशी झालेलं बोलणं आठवलं. मी त्याबाबत कुंबळेला माहिती दिली. डॉ. श्रीधर यांनी स्वत:हून सेहवागला कोचपदासाठी अर्ज कर असे सांगितले नव्हते याची मला खात्री आहे. त्यांना नक्कीच कुणीतरी तसं सांगण्याचा सल्ला दिला असेल.’ असा दावा शेट्टी यांनी केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड फायनलमध्ये पावसाचा अडथळा! वाचा कसे आहे हवामान विराटने केले आरोप रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या पुस्तकात पुढे लिहिले आहे कि, ‘अनिल कुंबळे कोचपदी राहवे अशी काही लोकांची इच्छा नव्हती हे हैदराबादमधील बैठकीतून स्पष्ट झाले होते. मला त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी लंडनमध्ये झालेल्या एका बैठकीबाबत माहिती झाली. त्या बैठकीला विराट कोहली, अनिल कुंबळे, जौहरी, अमिताभ चौधरी आणि डॉ. श्रीधर उपस्थित होते. या बैठकीत विराटने कुंबळेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. कुंबळे खेळाडूंना पाठिंबा देत नाहीत. त्यांच्यामुळे ड्रेसिंग रूमचे वातावरण तणावपूर्ण होते यासह अनेक आरोप विराटने केले होते.’ असा खुलासा शेट्टी यांनी पुस्तकात केला आहे. या सर्व घटनाक्रमानंतर काही दिवसांनी अनिल कुंबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.