ajinkya rahane injury
मुंबई, 3 डिसेंबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून खेळवली जात आहे. मात्र, मॅचपूर्वीच टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण लागले. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. परंतु़, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने, इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याचवेळी जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायांचे स्नायू दुखावले आहेत. अशी कारणे दिली. मात्र, चाहत्यांना अजिंक्य रहाणेसंदर्भात दिलेले कारण काही पटलेले नाही. चाहत्यांसोबत बीसीसीआयने खोटे बोलल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
कारण, 2 डिसेंबर रोजी बीसीसीआयने सरावाचा फोटो पोस्ट केला तेव्हा रहाणेच्या फलंदाजीच्या सरावाचा फोटो समोर आला होता. त्यामुळे, दुखापतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. एक दिवस आधीपर्यंत तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होते. त्यांना कोणतीही दुखापत झाल्याची माहिती नाही. मग अचानक कशी काय दुखापत? असा सवाल क्रिकेट जगतात उपस्थित होत आहे.
अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म गेल्या वर्षभरापासून कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याची बॅट शांतच राहिली. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात तो 35 धावा करुन बाद झाला तर दुसऱ्य डावात त्याला अवघ्या 4 धावांचं योगदान देता आलं. डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजिंक्य रहाणे वर्षभरापासून फ्लॉप ठरतोय, त्यामुळे त्याला या सामन्यात डच्चू दिला आहे, असा सूर सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, प्लेइंग इलेव्हनमधून जेव्हा खेळाडू वगळला जातो तेव्हा फक्त दुखापतीचे नाव दिले जाते. गेल्या काही मालिकांमधून हे सातत्याने घडत आहे.
2021 मध्ये खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेचे कसोटीतील आकडे खूपच खालावले आहेत. भारतासाठी 75 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वात वाईट आहे. रहाणेने 79 कसोटीत 39.30 च्या सरासरीने 4795 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. रहाणे वगळता, 75 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या भारताच्या एकाही फलंदाजाची सरासरी 40 पेक्षा कमी नाही. अशा स्थितीत रहाणे टीम इंडियातून जवळपास डच्चू दिला असल्याचे मानले जात आहे.