बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक, पाकिस्तान बॅकफूटवर
मुंबई, 24 मार्च : मागील अनेक महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांमध्ये आशिया कप 2023 ला घेऊन वाद सुरु होते. आशिया कप 2023 चे आयोजन हे यंदा पाकिस्तानात होणार असल्याने भारतीय संघ तेथे खेळायला जाणार नाही असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले होते. यावर पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने देखील यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये संमेलित न होण्याची धमकी दिली होती. परंतु आता आशिया कप 2023 च्या या वादावर तोडगा निघाल्याची माहिती मिळत आहे. आशिया कप 2023 वरून भारत पाकिस्तान या देशांमध्ये होणाऱ्या वादावर आता सुवर्ण मध्यय काढण्यात आलाय आहे. भारत यंदाचा आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसून भारत पाकिस्तानात होणारे सामने हे दुसऱ्या देशात खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. इसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कप 2023 मधील भारताचे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यासाठी तयार झाले आहेत. तेव्हा आशिया कपमधील भारताचे सामने हे यूएई, श्रीलंका, ओमान अथवा इंग्लंड येथे खेळवले जातील. आशिया कपच्या आयोजन समितीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी लवकरच याबाबत अधिकृत पत्रक काढून माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.
आशिया कप 2023 मध्ये यंदा भारत , पाकिस्तान, अफगाणिस्थान, कुवेत, हॉंगकॉंग, श्रीलंका, यूएई, सिंगापूर आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहेत. आशिया कपचे आयोजन यंदा पाकिस्तानमध्ये होणार असून 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा पारपडणार आहे.