नवी दिल्ली, 21 जुलै : घरात सुख-समृद्धी नांदावी, शांततामय वातावरण असावं आणि कुटुंबातल्या सदस्यांना आरोग्य लाभावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. वास्तू अर्थात घराची रचना योग्य असेल तर या गोष्टी सहज साध्य होतात; मात्र घराची रचना सदोष असेल तर कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्राचे (Vastu shastra) अभ्यासक सांगतात. वास्तुशास्त्रामध्ये आठही दिशांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. घरातल्या सर्व वस्तू योग्य दिशेला ठेवलेल्या असतील तर मनासारखे परिणाम दिसून येतात. तसंच घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) राहावी यासाठी तुटलेल्या वस्तू, भांडी घरात साठवून ठेवू नयेत. आठ दिशांपैकी ईशान्य दिशा (Northeast) ही अत्यंत शुभ समजली जाते. त्यामुळे घरातला ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवावा. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेच्या अनुषंगानं काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. `अमर उजाला`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा अत्यंत शुभ आणि पवित्र समजली जाते. या दिशेला देवाचं निवासस्थान असं मानलं जातं. त्यामुळे घरातला ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. ज्या घरातला ईशान्य कोपरा स्वच्छ आणि निर्दोष असतो, त्या घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि लक्ष्मी नांदते असं सांगितलं जातं. भगवान शंकरांचं (Lord Shiva) स्थानदेखील ईशान्य दिशेला असतं. तुम्हाला घराचं सुख हवं असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असावं. या कोपऱ्यात पूजा-विधी केल्यास ते देवाला सदैव मान्य असतात आणि त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते. ईशान्य कोपऱ्यात विहीर, बोअरिंग, हौद किंवा पिण्याच्या पाण्याचा स्रोत (Water Source) असणं उत्तम मानलं जातं. नवं घर बांधत असाल तर या दिशेला बोअरिंगची व्यवस्था करावी किंवा भूमिगत टाकी बांधावी. घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी हा कोपरा कायम स्वच्छ ठेवावा. या दिशेला केळी किंवा तुळस लावल्यास आणि रोज त्यांची पूजा केल्यास धनलाभ होतो. या दिशेला मुलांची अभ्यासाची खोली असावी. या दिशेला एकाग्रतेनं अभ्यास होतो. वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू (Heavy Objects) ठेवू नये. या कोपऱ्यात जड वस्तू ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे या दिशेला कपाट, स्टोअर रूम नसावी. या दिशेला देवाचं वास्तव्य असतं, असं मानलं जातं. त्यामुळे या कोपऱ्यात चपला, बूट किंवा कचऱ्याचा डबा ठेवू नये. असं केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा आणि समस्या वाढतात. या दिशेला टॉयलेट नसावं. या दिशेला टॉयलेट (Toilet) असेल तर शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच साठवलेला पैसा खर्च होतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात नवविवाहित दाम्पत्याची बेडरूम नसावी. असं असेल तर नात्यात अडचणी निर्माण होतात. विनाकारण समस्यांचा सामना करावा लागतो.