अजित पवार मुख्यमंत्री होणार? काय म्हणाले सुनिल तटकरे?
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 23 जुलै : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी वाढदिवस झाला, त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत पोस्टर लावले. अजित पवार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनीही मिटकरी यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. लवकरच अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं अनिल पाटील म्हणाले. एकीकडे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. काय म्हणाले सुनिल तटकरे? ‘राज्याच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो तेव्हा मुख्यमंत्रीपदावर स्पष्टता झाली आहे. आम्ही एनडीएचा घटक आहोत. मुख्यमंत्रीपद दादांना मिळावं, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र आता आम्ही महायुती उभी केली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही,’ असं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. ‘संजय राऊत, विनायक राऊत यांनी काय म्हणावं आणि त्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. टीका टिप्पणीपासून अलिप्त राहणं आणि राज्याच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली आहे. ‘निधी वाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही, शिवसेना आमदारांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. आता कुणाची नाराजी असेल तर त्याच्याबद्दल मी बोलणं उचित नाही. सगळ्यांना निधी देऊन न्याय दिला आहे. आगामी काळात एनडीए बरोबर काम करण्याचा मानस तयार केला आहे,’ असं सुनिल तटकरे म्हणाले.