पुणे, 6 मे : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या राजकीय फटकेबाजीसाठी ओळखले जातात. पण आज त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरुन फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. या व्हिडीओत ते चांगलेच फटकेबाजी करताना दिसत आहेत. ते पहिल्या चेंडूत थेट मोठा फटका मारताना दिसतात. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ते उंच फटका मारतात. त्यांच्या फटकेबाजीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते टाळ्या वाजवत संजय राऊतांना प्रोत्साहन देताना दिसले. संजय राऊत आज पुणे जिल्ह्यातील लांडेवादी इथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात आले होते. आढळराव यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी फलंदाजीचा आनंद लुटला. फलंदाजीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना मोठा इशारा दिला. शिरुर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील पुन्हा निवडून येतील. ते लोकसभेत जातील, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच “आपण प्रत्यक्षात कधीही क्रिकेट खेळलो नाही. मात्र आपण समोरच्याला चितपट करू शकतो. बॉलिंग, बॅटिंग आणि काहीही करू शकतो”, असं विधानही राऊतांनी यावेळी केलं.
( ‘मी आताच सांगतो, कुणीपण असू द्या, गय करणार नाही’, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा ) “स्थानिक पातळीच्या सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एत्रित लढवणार असून शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्यामागे उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत. संसदेत पुढचे खासदार आढळराव पाटीलच असतील”, असं विधान करत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात थेट इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार शनिवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार अयोध्या दौऱ्यावर आहेत. हे आमच्यासाठी चांगलं आहे. हा धार्मिक किंवा एका राजकीय पक्षांचा प्रश्न नाही. तर सर्वांचा धार्मिक मुद्दा आहे. तसेच शिवसेनेसाठी अयोध्या नवीन नाही, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी नेमका कोणता मुद्दा उचलला? हा संशोधनाचा विषय आहे, असा टोमना मारला.