पुणे, 15 नोव्हेंबर: दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे नवं संकट पुढील चोवीस तासात सक्रिय होणार आहे. परिणामी पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. आज पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि नांदेड या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित तेरा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहणार असून 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार आहे. यासोबतच आज परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. याठिकाणी सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुढील पाचही दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा- नागपुरातील 20 मकाक माकडांच्या मदतीने बनली Covaxin; रंजक आहे निर्मितीची कथा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि ईशान्यकडील मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. परभणीत एकाच दिवशी किमान तापमानात तब्बल 5 अंशाची वाढ झाली आहे. ढगाळ हवामानामुळे नारिकांना उकाड्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. त्याचं बरोबर ढगाळ हवामानमुळे पिकांवर किड पडण्याचा धोका देखील वाढत आहे.