फाईल फोटो
पुणे, 1 मार्च : सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वातावरणात देखील त्या बाबत कमालीचा बदल जाणवत असून उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच चांगले उन तापायला सुरुवात झाली आहे. त्यात यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. तर आगामी तीन महिने असेच ‘तापदायक’ राहतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी वर्तवला. हवामान विभागाने काय म्हटले - गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात मार्च ते मे या महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच हा वाढता उकाडा असह्य ठरेलच; पण त्याचा परिणाम कृषी उत्पादनावरही होईल आणि महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘आयएमडी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी मंगळवारी मार्च महिन्याबाबत हवामान अंदाजाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या काळात देशात सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता भान यांनी वर्तवली. 1877 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023 हा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. तिसरीत शिकणारी शेतकऱ्याची लेक शाळा सोडून शेतात, कांद्यानं चिमुकल्यांनाही रडवलं फेब्रुवारीतील उष्णतेची कारणे काय - घटलेली चक्रीवादळांची संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणे असल्याचे ‘आयएमडी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान म्हणाले. त्याच वेळी मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसल्या आहेत. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तर अचानक रात्री थंडी वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.