कसबा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला
पुणे, 23 मार्च : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. 26 फेब्रुवारीला दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केल्यानं भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप विशेष खबरदारी घेत असून, भाजपचे महत्त्वाचे नेते हे कसब्यामध्येच तळ ठोकून आहेत. प्रतिष्ठा पणाला कसबा मतदारसंघात गेल्यावेळी भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांचा विजय झाला होता. मात्र आता त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लगाली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुढचे दोन दिवस भाजप नेत्यांना कसब्यात तळ ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फडणवीसांच्या शिलेदारांवर कसब्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गिरीश महाजनांवर जबाबदारी कसबा मतदारसंघाची जबाबदारी गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर या भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असल्यानं सर्व कामं बाजूला सारून फक्त आणि फक्त कसबा पोट निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश भाजप नेत्यांना देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक हालचालीवर भाजपकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्यानं भाजपसोबतच महाविकास आघाडीकडून देखील जोरदार प्रचार सुरू आहे. आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच मविआ नेत्यांच्या सभा देखील होणार आहेत.