फाईल फोटो
पुणे, 13 मे : पुण्यातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानक रिकाम करण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसरात बीडीडीएस पथकाकडून तपास सुरू करण्यात आलं आहे.
रेल्वे स्थानकातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामं करण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या जिलेटीनच्या कांड्या निष्क्रिय करण्याचं काम बीडीडीएस टीमकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू आढळ्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या सर्व ट्रेन्स तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याची माहिती सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बीडीडीएस टीम घटनास्थळी दाखल झाली. तीन दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर जिवंत स्फोटके आढळली नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर 10 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एका बॅगमध्ये स्फोटके आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून बॅग ताब्यात घेतली. 10 मे रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या मुख्य दाराच्या बाजूला असलेल्या पोलीस बूथजवळ एका बॅगमध्ये 56 जिलेटिनच्या काड्या सापडल्या. त्या काड्या एका सर्किटमध्ये जोडलेल्या होत्या. नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्यूज करण्यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात नेली. बॉम्ब सदृश वस्तूमध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो intensity च्या स्फोटकांचा 56 छोट्या काड्या एकमेकांशी सर्किटनं जोडलेल्या स्वरूपात होते. बीडीडीएसला सुरुवातीला जिवंत बॉम्बसारखे वाटल्यामुळे ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएसच्या खास गाडीमध्ये पोलीस मुख्यालय परिसरात नेण्यात आलं होतं. त्यानंतर तेथे त्याला निष्क्रिय करण्यात आले.