file photo
पुणे, 21 जून : आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री राम, हनुमान आणि रावण या तिघांनाही चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत आणि नागरिकांमध्येही मोठी नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुष या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी तसेच निर्माता आणि कलाकारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात खासदार बारणे यांनी काय म्हटले - या निवेदनात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. आदिपुरुष चित्रपटाची कथा, दृश्यांवर देश-विदेशात टीका होत आहे. तसेच भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली आहे. चित्रपटात अशोभनीय संवाद आहेत. सीता, हनुमान आणि रावण यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत केले आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. Adipurush: आदिपुरुषवर देशात बंदी घालण्यासाठी थेट मोदींना पत्र; AICWA ने उचललं मोठं पाऊल हा चित्रपट देश-विदेशात प्रदर्शित झाला तेव्हापासून वादात सापडला आहे. आदिपुरुष या चित्रपटाला देशात विरोध होत आहे. या चित्रपटात अनेक अयोग्य आणि असभ्य संवाद वापरले गेले आहेत. त्यामुळे देशभरातून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. भगवान हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे. चित्रपटात श्री हनुमानाच्या व्यक्तिरेखेला अपमानास्पद संवाद देण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे वर्णन केले आहे. परंतु, त्यातील एकही पात्र आपल्या धर्माच्या नियमांनुसार नाही. सनातन आस्था आणि सनातनप्रेमींचे हृदय दुखावणारे असे संवाद चित्रपटात आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेली सर्व पात्रे रामायणाच्या कथेच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. हा चित्रपट म्हणजे आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. हिंदू धर्मांची कथा पूर्णपणे चुकीच्या आणि अशोभनीय पद्धतीने दाखवणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी. निर्माता, कलाकारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी निवेदनातून केली आहे.