प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 12 जून : पंढरीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याची सेवा करण्यात पुणेकर सध्या दंग झाले आहेत. वारकर्यांना वैद्यकीय उपचार देण्यापासून ते चप्पल दुरुस्त करण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारांनी पुणेकरांनी त्यांच्याबद्दल जिव्हाळा व्यक्त केलाय. वारकऱ्यांना कशाचीही कमतरता भासू नये यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांना खास सुविधा देण्यात येणार आहेत. 12 ते 14 जून या तीन दिवसांमध्ये या सुविधा देण्यात येतील. काय आहेत सुविधा? पुणे शहात वारीनं प्रेवेश केल्यापासून वारीच्या प्रत्येक मार्गावर या विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. पुणे शहरामध्ये जवळपास 40 ठिकाणी आरोग्य विभागाचे बूथ उभा करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना या बुथमध्ये मोफत औषधोपचार मिळतील. सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी याबाबत माहिती दिलीय.
‘वारकऱ्यांना पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या रुग्णवाहिकेसोबतच 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील त्यांच्या सेवेसाठी तत्पर असेल. पुणे ते पंढरपूर या प्रवासात आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका, डॉक्टर, फार्मसी आणि नर्सिंग स्टाफ जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तुकाराम महाराजांची पालखी कधी सुरू झाली? थेट वंशजांनीच सांगितला इतिहास, Video महिला वारकऱ्यांना खास सोय आषाढी वारीत महिला वारकऱ्यांची संख्या मोठी असते. महिलांसाठी प्रशासनाकडून खास हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलाय. त्यामध्ये महिला वारकऱ्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात येणार आहे. महिलांमध्ये जनजागृती करणे आणि आरोग्याच्या स्वच्छतेबाबत माफिती देणे हा याचा उद्देश आहे. महिलांना आरोग्याबाबत काही अडचणी आल्यास हिरकणी कक्षामार्फत स्त्रीरोगतज्ज्ञाची देखील सोय करण्यात आलीय,’ अशी माहिती वावरे यांनी दिली.