अंतराळातून आणि आकाशातून उडी मारणं यात बराच फरक आहे. विमानातून उडी मारणं हा सध्या एक रोमहर्षक खेळ म्हणून पुढे येतो आहे. यात लोकं विमानातून पॅराशूटच्या साह्यानं खाली उडी मारतात व एका निश्चित ठिकाणी उतरतात. मात्र अंतराळातून अशा पद्धतीनं जर कोणी खाली उडी मारली तर काय होईल? एखादा अंतराळवीर अंतराळ स्थानकावरून खाली पडला तर? तो खरोखरच जिवंत राहू शकेल का आणि राहिलाच तर तो पृथ्वीवर सुखरूप पोहचू शकेल का?
अंतराळातून स्पेस सूट न घालता खाली पडणं धोकादायक ठरू शकतं. कारण अशा परिस्थितीत तुमच्याकडे जिवंत राहण्यासाठी केवळ 30 सेकंद असतात. स्पेस सूट न घातल्यानं तुमचं शरीर गोठणार नाही किंवा तुमच्या शरीरात कोणता स्फोटही घडणार नाही. मात्र तुम्हाला जिवंत राहण्यासाठी केवळ 15 सेकंद शिल्लक राहतील. त्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर अंधारी येईल.
अशा परिस्थितीत पृथ्वीवर पडण्याची शक्यता असेल की नाही यापेक्षा जिवंत राहाल का हा महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण ऑक्सिजन नसेल तर 3 मिनिटांच्या आत तुमचा मृत्यू होईल. पण 30 सेकंदांच्या आत तुम्हाला वाचवण्यात यश आलं, तर तुम्ही व्यवस्थित राहण्याची शक्यता वाढते.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून तुम्ही स्पेस सूट घालून बाहेर आलात, तर ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. पण तुम्ही लगेचच पृथ्वीवर पडणार नाही. पृथ्वीच्या कक्षेमध्ये असल्यानं तुम्ही पृथ्वीभोवती फिरत राहाल. कारण पृथ्वीच्या कक्षेत असलेली कोणतीही गोष्ट तिच्याभोवती फिरत राहते. लगेचच पृथ्वीवर खाली पडत नाही.
तरीही तुम्ही अंतराळ स्थानकावरून उडी मारलीत, तर बाहेर आल्यानंतर जवळपास 2.5 वर्षांनंतर तुम्ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत येऊन खाली यायला सुरुवात कराल. चीनचं अंतराळ स्थानक तियानगोंग 1 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर यायला 2 वर्ष लागली होती. आता ते पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आहे.
याचाच अर्थ अंतराळातून उडी मारून पृथ्वीवर येणं सोपं नाही. या वाटेत अंतराळातील कचऱ्याचे तुकडे तुम्हाला धडकू शकतात. ते तुकडेही पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. त्यापासून तुम्ही वाचलात, तर पृथ्वीच्या कक्षेत आल्यावर ध्वनीच्या 6 पट वेगानं खाली आल्यामुळे घर्षण होऊन तापमान 1600 अंशांवर जातं. या तापमानात लोखंडसुद्धा वितळतं, तर आपला निभाव कसा लागणार?