झाडं ऑक्सिजन देऊन आपलं पर्यावरण सुदृढ ठेवण्याचं कार्य करतात. त्यामुळेच 'झाडे लावा झाडे जगवा' असं म्हटलं जातं. खरंतर महागडं झाड, असं म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते लाल चंदनाचं. परंतु तुम्हाला माहितीये का, जगात लाल चंदनापेक्षाही महागडी झाडं आहेत. ज्यांची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते. शेकडो वर्ष जगणारी ही झाडं अत्यंत उपयुक्त असतात. आज आपण अशाच महागड्या झाडांविषयी जाणून घेऊया. चंपारणच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात काळी शीशम म्हणजेच काळ्या गुलाबाची झाडं भरपूर प्रमाणात आहेत. सरायमान जंगलाचे रक्षक कैलास सांगतात की, या झाडांच्या लाकडाची लांबी 40 ते 50 फूट इतकी असून रंग हलका लालसर आणि काळा असतो. चांगल्या दर्जाचे फर्निचर, रायफल, गिटार, इतर वाद्ये, क्रीडा उपकरणे, प्लायवूड आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बाजारात या एका घनफूट लाकडाची किंमत सुमारे 5 ते 6 हजार रुपये इतकी आहे. गमहार वृक्षाची वाढ खूप जलद गतीने होते. त्याच्या लाकडापासून अनेक प्रकारचे फर्निचर बनवले जातात, जे वर्षानुवर्षे टिकतात. याची एका एकरात सुमारे 500 रोपं लावली जातात. त्यामुळे यापासून 25 ते 30 वर्षात तब्बल एक कोटीपर्यंत कमाई होते. विशेष म्हणजे इतर मौल्यवान झाडांच्या तुलनेत हे झाड लवकर परिपक्व होतं. सफेदाच्या झाडाचं लाकूड बेल्ट, इंधन, हार्ड बोर्ड, फर्निचर, इत्यादी बनवण्यासाठी वापरलं जातं. हे झाड केवळ 5 वर्षात व्यवस्थित परिपक्व होतं. त्यानंतर त्याची कापणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे या झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळतं. बाजारात त्याची किंमत 6 ते 7 रुपये प्रति किलो आहे, परंतु विशेष गोष्ट अशी की, एका हेक्टरमध्ये ही तीन हजार झाडं लावली जातात, ज्यातून 80 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करता येते. जहाज, दागिने, फर्निचर, प्लायवूड, सजावटीचे साहित्य आणि शिल्प तयार करण्यासाठी महोगनी वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. त्याचबरोबर कर्करोग, रक्तदाब, दमा, सर्दी, मधुमेह यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी या झाडाची पानं अत्यंत उपयुक्त ठरतात. त्याचं लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट दराने मिळतं. त्यामुळे या झाडाची लागवड करून शेतकरी 50 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतात. कर्मवृक्षही अतिशय मौल्यवान मानलं जातं. 40 ते 50 वर्षांच्या लागवडीनंतर या एका झाडाची किंमत लाख रुपयांपर्यंत जाते. सिंदूरदाणी बनवण्यासाठी या वृक्षाच्या लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सागाचं झाड अत्यंत उपयुक्त मानलं जातं. त्याचं लाकूड खूप टणक आणि मजबूत असतं. त्यापासून दरवाजे, खिडक्या आणि इतर फर्निचर बनवले जातात. तसेच त्याच्या पानांपासून बश्या बनवल्या जातात. याशिवाय श्वासोच्छवास, अशक्तपणा, त्वचारोग, मधुमेह, अल्सर किंवा शरीरावरील जखमा यांसारख्या आजारांवर औषध बनवण्यासाठी या झाडाच्या फळांचा उपयोग होतो. अशा या परिपूर्ण झाडाच्या लाकडाला भारतात प्रचंड मागणी आहे. काळ्या गुलाबाच्या लाकडाप्रमाणे सागवानदेखील खूप मौल्यवान आहे. परिपूर्ण वाढीनंतर या झाडापासून कोट्यवधींची कमाई होऊ शकते. याच्या लाकडापासून बनवलेलं फर्निचर किमान 200 वर्ष सहज टिकतं. विशेष म्हणजे या झाडाची वाढ जलदगतीने होते. बाजारात त्याची किंमत 4 ते 5 हजार रुपये प्रति घनफूट इतकी आहे. चिलबिल वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचं रोप 100 रुपयांपर्यंतदेखील विकत घेता येतं. 70 ते 80 वर्षांत त्याची किंमत एक ते दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचते. एक औषधी वृक्ष म्हणून हे वृक्ष अत्यंत उपयोगी मानलं जातं.