एकेकाळी राजपक्षे कुटुंबाशिवाय श्रीलंकेत पानही हलत नव्हते. मात्र, देशाची आर्थिक स्थिती ढासळल्याने मोठा उठाव झाला. परिणामी संपूर्ण कुटुंबाला सत्ता सोडावी लागली. यातील राष्ट्रपती असलेले गोटाबाया राजपक्षे सध्या आश्रय मिळावा यासाठी अनेक देशांचे उंबरे झिजवत आहेत.
श्रीलंकेचे पदच्युत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी कोणत्याही देशात आश्रय न मिळाल्याने त्यांचे अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करण्यासाठी अर्ज केला आहे. प्रसारमाध्यमांमधील एका वृत्तात असे म्हटले आहे.
73 वर्षीय राजपक्षे यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये आर्थिक संकट आणि तत्कालीन सरकारविरोधातील निदर्शने दरम्यान देश सोडून पलायन केले होते. जवळपास दोन महिन्यांनंतर ते परतले. त्यांच्या विनंतीवर अमेरिकन सरकारने अद्याप विचार केला नाही, असे द संडे टाईम्स वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
2019 च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राजपक्षे यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडले होते. श्रीलंकेच्या संविधानानुसार दुहेरी नागरिकत्व असलेल्या लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी आहे.
"राजपक्षे यांच्या वकिलांनी यूएस सरकारला केलेल्या अपीलातून परराष्ट्र खात्याला त्यांचे नागरिकत्व पुन्हा देण्याची विनंती केली आहे. यावर अद्याप विचार केला गेला नाही," असे अहवालात म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय सध्या सुट्टीसाठी दुबईत आहेत. माजी राष्ट्रपती गेल्या वर्षी 13 जुलै रोजी श्रीलंकेतून मालदीवला पळून गेले होते. तेथून ते सिंगापूरला गेले आणि नंतर थायलंडला. 2 सप्टेंबर 2022 रोजी ते घरी परतले.