अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सरकार स्थापनेची तयारी तालिबाननं (Taliban) वेगानं सुरु केली आहे. काबूलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेचा मोठा कार्यक्रम होणार आहे. या सत्तास्थापनेच्या वेळी तालिबान त्याच्या 6 मित्र देशांना आमंत्रण देणार असल्याचं वृत्त आहे.
तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेण्याची पूर्ण रणनीती ही पाकिस्ताननं बनवली, असं तज्ज्ञांचं मत आहे. पाकिस्तान सैन्यातील अधिकारी तालिबानची मदत करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये गेले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उघडपणे तालिबानतं कौतुक करत असतात. पाकिस्तानला आता हक्कानी नेटवर्कच्या माध्यमातून अफगाणिस्तानवर राज्य करायचं आहे.
चीन हा तालिबानला मान्यता देणारा पहिला देश आहे. चीन आपली ‘बॅक बॅलन्स’ असल्याचा तालिबानचा समज आहे. कारण चीननं तालिबान सरकारला मदत करण्याचं जाहीर केलं आहे. तालिबान आर्थिक बाबतीमध्ये चीनवर अवलंबून असल्याची कबुली काही दिवसांपूर्वी त्यांचा प्रवक्ता मुजाहीदने दिली होती.
तालिबानला तुर्कीसोबतही चांगले संबंध हवे आहेत. नव्या सरकारच्या स्थापना कार्यक्रमात तुर्कीच्या अध्यक्षांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. अफगाणिस्तावरील सत्ता मजबूत करण्यासाठी तुर्कीच्या मदतीचा उपयोग होईल, अशी तालिबानला आशा आहे.
तालिबानने त्याचा जवळचा मित्र कतार सरकारलाही निमंत्रण दिलं आहे. कतार आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. अमेरिका आणि तालिबान यांच्यातील चर्चेचं यजमानपद कतारकडेच होतं. दोहामध्ये झालेल्या शांती करारामध्येच अमेरिकेनं अफगाणिस्तानातून सैन्य हटवण्याची घोषणा केली होती.
तालिबानला अमेरिकाचा विरोधी असलेल्या रशियाचाही पाठिंबा मिळत आहे. तालिबानशी मैत्री झाली तर देशाला दहशतवादाचा धोका राहणार नाही, अशी रशियाला आशा आहे.
तालिबान इराणच्या धर्तीवर सरकार स्थापन करेल, असं वृत्त आहे. त्यामुळे तालिबाननं इराणच्या प्रमुखांनाही निमंत्रण दिलं आहे. तालिबान आणि इराणमध्ये मागील काही वर्षांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. इराणनं गणी सरकार उलथवून टाकण्यात तालिबानला मदत केली होती. आता तालिबान अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांशी चांगला व्यवहार करेल, अशी इराणला आशा आहे.