राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक कोल्हापूरचे जनक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या प्रगतीचे एक एक नवे पान लिहिले गेले. कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात त्यांचा लाखमोलाचा वाटा आहे. शाहू महाराजांच्या स्मृती दिनी पाहुयात कोल्हापुरात शाहूराजांनी बांधलेल्या काही अमूल्य वास्तू...
राधानगरी धरण : कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. अवघे कोल्हापूर सुजलाम सुफलाम करण्यासाठी या धरणाचा सर्वात मोठा वाटा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1908 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली. 38.41 मीटर उंच व 1037 लांब असे हे ऐतिहासिक धरण असून धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी अनोख्या 7 स्वयंचलीत दरवाजांची यंत्रणा बसवलेली आहे.
शाहूपुरी व्यापारपेठ : कोल्हापूरच्या गुळाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठ महत्त्वाची ठरते. ही व्यापरपेठ राजर्षी शाहू महाराजांनी वसवली आहे.
खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह : रोम येथील दौऱ्यानंतर शाहू राजांनी कोल्हापुरात कुस्त्यांचे मैदान आणि पॅलेस थिएटर म्हणजेच सध्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह स्थापित केले होते.
साठमारी : हत्तींचा वापर होणारा साहसी खेळ शाहूकाळात खेळला जात असे. शाहू राजांनी कोल्हापुरातील रावणेश्र्वर मंदिर परिसरात यासाठी साठमारी उभारली होती.
धुण्याची चावी : शाहू महाराजांनी तलावात जनतेला कपडे धुण्यास मनाई केली होती. मात्र त्यासाठी सोयीची व्यवस्था म्हणून रंकाळा तलावातील पाणी चावीच्या साहाय्याने बाजूला आणले. हे पाणी पुन्हा तलावात मिसळणार नाही, यासाठी विशेष सोय असणाऱ्या कित्येक चाव्या शाहू राजांनी रंकाळा तलाव परिसरात उभारल्या.
विविध वसतिगृहे : शाहू राजा हा सामान्य जनतेच्या प्रत्येक गोष्टी बद्दल विचार करणारा राजा होता. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांनी मराठा, जैन, मुस्लीम, लिंगायत, मिस क्लार्क, नामदेव, कायस्थ प्रभू, सारस्वत, पांचाळ ब्राह्मण, इंडियन ख्रिश्चन, देव आर्य समाज, वैश्य, ढोर चांभार, शाहू सोमवंशी आर्य क्षत्रिय अशी अनेक वसतिगृहे 1901 ते 1922 दरम्यान बांधून सुरू केली होती.
शाहू मिल : शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यामुळेच त्यांनी उद्योग वाढवण्यासाठी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल ही कोल्हापूर शहरात स्थापन केली होती. सध्या ही मिल बंद अवस्थेत आहे.
कोल्हापूर रेल्वे स्थानक : कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसर हा पूर्वी घोटाळे तलावाचा परिसर म्हणून ओळखला जात असे. शाहुराजांनी संस्थांनची ही जागा रेल्वेसाठी दिली. 3 मे 1988 रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते या ठिकाणी कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी करण्यात आली होती. दरम्यान याव्यतिरिक्त कोल्हापूरमधील पहिली जिनिंग फॅक्टरी, पहिली ऑईल मिल, पहिली सॉ मिल, फौंड्री, इलेक्ट्रिक कंपनी, मोटर ट्रान्सपोर्ट कंपनी अशा अनेक वास्तू शाहूकाळातच सुरू झालेल्या आहेत.