देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची यादी विनायक दामोदर सावरकर या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विद्यार्थीदशेतच देशसेवेची शपथ घेतली. त्यानंतर आयुष्यभर त्यांनी देशसेवेचं व्रत जपलं.
आजही सावरकरांचा त्याग, त्यांचे देशप्रेम, त्यांचे विचार हे सर्वांना प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची 28 मे रोजी जयंती आहे. सावरकरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या मुंबईतील वास्तूचा इतिहास आपण जाणून घेऊया.
देशाला प्रेरणा देणारी वास्तू मुंबईच्या मध्यवस्तीत असलेल्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आहे. डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला पांढऱ्या रंगाची इमारत दिसते. ही वास्तू म्हणजेच लाखो देशभक्तांची प्रेरणा असलेले सावरकर सदन होय.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 10 मे 1937 रोजी रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली. त्यानंतर ते दादरच्या गणेश पेठ लेन येथील सावरकर भुवन या स्वत:च्या घरात सर्व कुटुंबासोबत राहिले. त्यानंतर त्यांनी ही इमारत विकून शिवाजी पार्क वसाहतीमधील प्लॉट नंबर 71 वरील जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू केले.
या इमारतीचं बांधकाम सुरू असताना लेडी जमशेटजी रोडवरील ‘भास्कर भुवन’ या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर काही काळ कुटुंबासमवेत वास्तव्य केले. त्या वेळेस त्यांनी 7548 रुपयांना हा प्लॉट घेतला होता. तळमजला, पहिला मजला आणि गच्ची अशी या इमारतीची सुरूवातीची रचना होती.
जून 1938 मध्ये ‘सावरकर सदन’ या वास्तूत स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि त्यांची मुले राहावयास आले. याच ठिकाणी सावरकरांचं शेवटपर्यंत वास्तव्य होते. याच घरातून त्यांनी हिंदूमहासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर दौरे काढून प्रचार केला.
भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सावरकरांनी तिरंगा ध्वज आणि कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज इमारतीच्या गच्चीवर फडकवला. 1948 साली गांधीजींच्या हत्येनंतर सावरकर सदनावर हल्ला झाला होता. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचे निधन झाले. त्यावेळी याच इमारतीमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लाखो नागरिकांनी सावरकरांचे अंत्यदर्शन घेण्यास त्या वेळी गर्दी केली होती.
1963 साली माई सावरकरांच्या निधनानंतर अंगणात तुळशीचे वृंदावन बांधण्यात आले. या वृंदावनावर माई सावरकर, सरस्वतीबाई सावरकर (येसूवहिनी) आणि ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ या संस्थेच्या कार्यकर्त्यां महिलांची माहिती असलेल्या कोनशिला बसवल्या आहेत.
या इमारतीत सध्या सावरकर कुटुंबातील त्यांची सून सुंदरताई सावरकर या राहत असून इतर भाडेकरूही राहतात. कालांतराने इमारतीत बदल झाले आहेत. सावरकरांच्या मृत्युपत्रानुसार जागेची वाटणी झाली. सध्या त्यांच्या कार्यालयाच्या जागी स्मारक असून तेथे त्यांना मिळालेली मानपत्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांची पुस्तके, जुने फोटो अशा महत्त्वाच्या वस्तू आहेत. दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी येथे साजरी होते. सुमारे 28 वर्षे सावरकरांचे या इमारतीत वास्तव्य होते. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावेच!