व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. त्यामुळे युजर्सचा आनंद आणखी वाढतो. आता कंपनी एका नवीन सिक्युरिटी फिचरवर काम करत आहे. त्यामुळे हॅकर्सना व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करणं कठीण होणार आहे.
रिपोर्टनुसार, WhatsApp इंस्टाग्राम सारख्या लॉगिन अप्रूव्हल फिचरवर काम करत आहे. यासह, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवरून लॉग इन करता तेव्हा तुम्हाला मेसेजिंग अॅपपवरून एक सूचना पाठवली जाईल. अशा प्रकारची सूचना सध्या दुसर्या डिव्हाइसवरून Instagram किंवा Facebook लॉग इन करताना प्राप्त होते.
आगामी व्हॉट्सअॅप फिचर प्लॅटफॉर्मची सुरक्षा वाढवेल. व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्सवर नजर ठेवणाऱ्या साइट Wabetainfo ने हे कळवले होते. ही साइट कंपनीच्या आगामी वैशिष्ट्यांबद्दल सांगते.
त्यानुसार व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर विकसित करत आहे. यामुळं वापरकर्त्यांना अनधिकृत लॉगिनपासून संरक्षण मिळेल. जेव्हा कोणी त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा वापरकर्त्यांना अॅपमध्ये सूचना दिली जाईल.
लॉगिन विनंती स्वीकारल्यानंतरच व्हॉट्सअॅप खातं इतर डिव्हाइसमध्ये लॉग इन करता येईल. याद्वारे तुम्ही इतर कोणतीही लॉगिन विनंती नाकारू शकता. म्हणजेच, एखाद्याला 6-अंकी कोड जरी मिळाला तरी तो तुम्ही विनंती स्वीकारल्याशिवाय तो लॉग इन करू शकणार नाही.
दुसऱ्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अॅडमिनला अधिक कंट्रोल देण्यावर काम करत आहे. याच्या मदतीनं ग्रुप अॅडमिन्स ग्रुपमधील दुसऱ्यानं पाठवलेले मेसेजही डिलीट करू शकतात. यासह आक्षेपार्ह माहिती हटवू शकतात.