आपल्यापैकी बहुतेकांना स्मार्टफोनच्या स्क्रीनची जास्त काळजी असते आणि बॅटरीची कमी. आपण स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी घेत नाही आणि ती लवकर डिस्जार्ज होऊ लागली की तक्रार करू लागतो. काही लोकांच्या बाबतीत असंही घडते की त्यांच्या फोनचा बॅटरी बॅकअप काही दिवसांनंतर फक्त एक तासासाठीच राहतो. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या काही वाईट सवयींमुळे असे घडते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
चार्जिंगचा चुकीचा मार्ग: स्मार्टफोनच्या बॅटरीचा बॅकअप कमी होण्याचे आणि ते लवकर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वापरकर्त्यांची चार्जिंगची चुकीची पद्धत. सामान्यतः लोक बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यावर चार्ज करतात. एकदा चार्जिंगला लावल्यावर 100 टक्के चार्ज केल्याशिवाय चार्जर काढत नाहीत. याच सवयीमुळं बॅटरी खराब होण्याचा धोका असतो. फोन 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्याची आणि तुमचा फोन 20 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी चार्ज करण्याची सवय लावा. मग फरक लक्षात येईल.
अॅप्स बंद न करणं: बहुतेक लोक स्मार्टफोनमध्ये अॅप्स वापरल्यानंतर ते बंद करत नाहीत. अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि बॅटरीचे आयुष्य कमी करतात. ज्याप्रमाणे तुम्ही कॉम्प्युटर वापरल्यानंतर बंद करता, त्याचप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनमधील अॅप्स वापरल्यानंतरही ते बंद करण्याची सवय लावा.
लोकेशन ट्रॅकिंग चालू ठेवणं: अनेक अॅप्सला युजर्सचं लोकेशन माहीत असतं. सहसा, वापरकर्ते ही अॅप्स डाउनलोड करतानाच ही परवानगी देतात. हे अॅप्स वारंवार GPS मॉड्यूल वापरून वापरकर्त्याचे लोकेशन जाणून घेतात. यामुळे बॅटरी लवकर संपते. तुमच्या लोकेशनची गरज नसलेल्या अॅप्सचे लोकेशन ट्रॅकिंग बंद केल्यास तुम्हाला अधिक बॅकअप मिळेल.
ब्राइटनेस पूर्ण ठेवणं: मोबाईल स्क्रीनची ब्राइटनेस कमी करणं खूप सोपे आहे. परंतु बरेच स्मार्टफोन वापरकर्ते तसे करण्याचा त्रास घेत नाहीत. अधिक ब्राइटनेस म्हणजे अधिक शक्ती खर्च होते. यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे आजपासून तुम्ही तुमचा फोन फुल ब्राइटनेसवर चालवण्याची सवय सोडली पाहिजे.