प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनचं तंत्रज्ञान झपाट्यानं बदलंत आहे. आता मोबाईल हातात न घेता कॉल करता येणार आहे. मोबाईलने नव्हे तर हाताच्या बोटाने कॉल करता येईल. यासाठी इटलीतील एका टेक कंपनीने Get नावाचं गॅजेट तयार केलं आहे. बोन कंडक्शन टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या या गॅजेटला ब्रेसलेटप्रमाणे मनगटावर घालता येतं. त्यानंतर आपल्या तर्जनीचा फोनसारखा वापर करता येईल.
गेटचं हे ब्रेसलेट स्मार्टफोनशी कनेक्ट करता येतं. हे कनेक्ट झाल्यानंतर फोनमधून निघणारा आवाज लहरींमध्ये परावर्तीत होऊन तर्जनीपर्यंत जातो आणि तिथून युजर्सला कॉल उचलण्यासाठी बोट कानावर टच करावं लागेल.
नव्या तंत्रज्ञानामुळं युजर्सना टॅप, स्क्रोल आणि बटन दाबण्याची गरज पडणार नाही असं कंपनीचे सहसंस्थापक एमलियैनो पैरिनी यांनी सांगितलं आहे. आउटगोइंग कॉल करण्यासाठी व्हॉइस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
फिटनेस बँडमधील फिचरसुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे. फिटनेस ट्रॅकर बँडसोबतच एनएफसी पेमेंटसुद्धा करता येणार आहे. तसेच इनबिल्ट व्हॉइस असिस्टंटही त्यामध्ये उपलब्ध असणार आहे.
अनेकदा जर तुमच्या इयरफोनचा आवाज मोठा असेल तर तुमचं बोलणं शेजारच्या व्यक्तीला ऐकू जाऊ शकतं. गेट वापरणाऱ्यांना ही समस्या येणार नाही. हे डिव्हाइस आवाजापेक्षा लहरींवर काम करतं. या ब्रेसलेटमध्ये कोणत्याही प्रकारची स्क्रीन नाही.
गेटचं हे नवं गॅजेट मार्च 2020 मध्ये बाजारात उपलब्ध होईल. यासोबत एक वायरलेस चार्जर मिळेल. तसेच तुमच्या साइजनुसार आणि आवडता रंग निवडण्याची मुभा युजरला असणार आहे. गेट ब्रेसलेटची किंमत 16 हजार 230 रुपये इतकी असेल.