21 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पारपडला होता. या सामन्यात आरसीबीचा मुंबईकडून 4 विकेट्सने पराभव झाला. हा सामना गमावल्यामुळे आरसीबी संघाची प्ले ऑफ राउंडमध्ये जाण्याची संधी हुकली आणि महिला आयपीएलच्या पहिल्या सिझनमधून आरसीबीचा संघ बाहेर पडला.
आरसीबी संघ महिला आयपीएलमध्ये 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवून 6 सामन्यात पराभूत झाला.
यंदा आरसीबी संघाचे नेतृत्व स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडे देण्यात आले होते. परंतु स्मृतीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही.
13 फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएलच्या ऑक्शनमध्ये स्मृती मानधनाला हिला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर फ्रेंचायझीने 3.40 कोटी बोली लावून खरेदी केले होते. यामुळे स्मृती ही महिला प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.
परंतु स्मृती मानधना महिला प्रीमियरच्या या हंगामात आरसीबी संघाच्या अपेक्षे प्रमाणे कामगिरी करू शकली नाही. भारतीय संघातून खेळताना भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने पाणी पाजणाऱ्या स्मृतीला तिचा सूर स्पर्धेच्या अखेर पर्यंत गवसला नाही.
स्मृती मानधनाने आरसीबीकडून 8 सामने खेळताना एकूण केवळ 149 धावांचे योगदान दिले. यामुळे स्मृतीची केवळ 1 धाव ही आरसीबीला तब्बल 2,28,187 लाखांना पडली. स्मृतीने महिला आयपीएलमध्ये 35, 23, 18, 4, 8, 0, 37, 24 अशा धावा केल्या.