तिलक वर्माचा वयाच्या 11 व्या वर्षी सुरू झालेला क्रिकेट प्रवास वयाच्या 20 व्या वर्षी टीम इंडियापर्यंत येऊन पोहोचला आहे. तिलकला पहिल्यांदाच भारतीय T20 टीममध्ये स्थान मिळालंय. त्याने आयपीएल 2023 मध्येही शानदार फलंदाजी केली होती. रवींद्र जडेजा, रोहित शर्मा यांनी तिलक टीम इंडियाचे भविष्य असल्याचं म्हटलं होतं, ते आता खरं होताना दिसतंय.
आयपीएल 2023 मध्ये तिलकने 11 सामन्यांत 343 रन केल्या. मागच्या सीझनमध्येही तो उत्तम खेळला होता, तेव्हापासून त्याला लवकरच टीम इंडियात संधी मिळेल असं वाटत होतं. अखेर तो दिवस उजाडला आहे. तिलकच्या क्रिकेट करिअरची सुरुवात 11 व्या वर्षी सुरू झाली होती. टेनिस बॉल क्रिकेट खेळताना त्याचं टॅलेंट सर्वांत आधी कोच सलाम बायश यांनी ओळखलं आणि नंतर त्याचा क्रिकेट प्रवास सुरू झाला.
'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना कोच सलाम बायश यांनी तिलकचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास सांगितला. ते म्हणाले, "मी त्याला एकेदिवशी टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहिलं. मला त्याची बॅटिंग खूप आवडली. त्यानंतर मी त्याच्या वडिलांना त्याला क्रिकेट अकादमीत आणण्याची विनंती केली. कारण त्याचवेळी त्याच्यातलं मोठा क्रिकेटपटू बनण्याचं टॅलेंट मला दिसलं होतं."
तिलकचे वडील इलेक्ट्रिशियन होते. मुलाचा क्रिकेटचा खर्च करण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे ते नाही म्हणत होते. नंतर कोच सलाम बायश यांनी तिलकची जबाबदारी घेतली. ते स्वतः त्याला न्यायला व सोडायला तयार झाले, त्यांनी कोचिंग फीदेखील माफ केली. इथूनच त्याच्या प्रोफेशनल क्रिकेटपटू होण्याचा प्रवास सुरू झाला. तिलकच्या घरापासून क्रिकेट अकादमी 40 किलोमीटर अंतरावर होती. मात्र त्याने एकही दिवस ट्रेनिंग मिस केलं नाही.
कोच सलाम बायश स्वतः पहाटे 5 ला तिलकच्या घरी यायचे आणि त्याला बाईकवर बसवून क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे. त्यावेळी तिलक 11 वर्षांचा होता. अनेकदा तो बाईकवर बसल्यावर झोपी जायचा. त्यामुळे त्याला झोपेतून उठवण्यासाठी कोच बाईक थांबवून पाण्याने तोंड धुवून द्यायचे, असं अनेक महिने सुरू होतं.
सुरुवातीला तिलककडे चांगली बॅटही नव्हती. त्याने उधार घेतलेल्या बॅटने एज ग्रुप क्रिकेटमधील पहिलं शतक झळकवलं होतं. इतक्या संघर्षानंतरही त्याने हिंमत हारली नाही आणि खेळत राहिला. चार वर्षांनंतर, त्याने विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी 900 हून अधिक रन केले होते. हा त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्याची हैदराबादच्या रणजी ट्रॉफीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाली. एका वर्षानंतर 2019 मध्ये त्याने हैदराबादसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आणि आता त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे.