एम एस धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. आयपीएल 2023 नंतर एम एस धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होईल असे म्हंटले जात आहे. परंतु यावर अद्याप धोनीने कोणते ही भाष्य केले नाही. आयपीएल सुरु असतानाच एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुरुवारी 4 मे रोजी 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी याबाबत घोषणा केली असून हा 12 मे आणि 7 जुलै रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
येत्या 12 मे रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट 30 सप्टेंबर 2016 रोजी पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता.
या चित्रपटात धोनीची भूमिका बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली होती. यावेळी चित्रपटाने वर्ल्ड वाईड 215.4 कोटींची कमाई केली होती.
एम एस धोनी चित्रपटाच्या पुनर्र प्रदर्शनाबद्दल डिझनी स्टारचे स्टुडिओचे प्रमुख बिक्रम दुग्गल यांनी सांगितले की, "एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा केवळ स्टार स्टुडिओसाठीच नव्हे, तर जगभरातील भारतीयांसाठीही एक खास चित्रपट आहे, जो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोनीचा प्रेरणादायी जीवनप्रवास दाखवतो. चित्रपटाच्या पुनर्र प्रदर्शना मागचा उद्देश देशभरातील धोनीच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सर्वात जादुई क्षण पुन्हा अनुभवण्याची आणखी एक संधी देणे हा आहे".