आयपीएल 2023 मधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने राहुलवर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे राहुल पुढील काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील.
केएल राहुलने शुक्रवारी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली असून त्याने आयपीएल 2023 सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधूनही माघार घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला केएल राहुलचा ऑप्शन शोधावा लागेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. 7 जून ते 11 जून या दरम्यान लंडन येथे ही फायनल मॅच होणार असून आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाचा संघ यासाठी रवाना होणार आहे.
भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे बऱ्याच महिने क्रिकेटपासून दूर आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला बुमराह टी 20 वर्ल्ड कप पासून ते आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला ही मुकला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पाठीवर देखील शस्त्रक्रिया पारपडली असून सध्या तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे पुनर्वसन व्यवस्थापन करत आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यादरम्यान स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत बळावली होती. त्यामुळे त्याला कसोटी मालिका अर्ध्यातच सोडावी लागली होती. काही दिवसांपूर्वीच श्रेयसवर लंडन येथे शस्त्रक्रिया पारपडली आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर देखील आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला ही मुकला आहे.
रिषभ पंतच्या कारला डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. यात पंत देखील गंभीर जखमी झाल्याने त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दुखापतीमुळे पंत तब्बल सहा महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो टीम इंडियाच्या बऱ्याच सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.