आयपीएल 2023 मधील 43 व्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात मॅचनंतर कडाक्याचे भांडण झाले.
लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या बाचाबाचीत गौतम गंभीरने उडी घेतल्याने विराट आणि गंभीरमध्ये ही बराच वाद झाला. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी विराट आणि गंभीरला ट्रोल करत आहेत.
आयपीएलने देखील आचार संहितेचा भंग केल्याने विराट कोहली आणि गंभीरला 100 टक्के मॅच फी फाईन म्हणून आकारली, तर वादाचे कारण ठरलेल्या नवीन उल हक वर देखील दंडात्मक कारवाई केली. परंतु यानंतर देखील दोघांमधील प्रकरण काही शांत होण्याचं नाव घेत नाही.
भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याने आता विराट गंभीरच्या वादावर उपहासात्मक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने म्हंटले, " मला वाटतं स्प्राईट या कोल्डड्रिंक ब्रँडने गौतम गंभीर आणि युवराज सिंह या दोघांना त्यांच्या 'थंड रख' या कॅम्पेनसाठी साइन करावे. काय वाटतं तुम्हाला?"
युवराज सिंहने केलेल्या ट्विटवर अद्याप विराट गंभीरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने देखील विराट गंभीरच्या भांडणाचा तीव्र निषेध केला होता आणि दोघांची कानउघाडणी केली होती.