भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं जबरदस्त मारा करत विंडीजच्या फलंदाजांची झोप उडवली. त्यानं हॅटट्रिकसह 6 गडी बाद केले. बुमराहनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हॅटट्रिक नोंदवली. अशी कामगिरी करणारा बुमराह भारताचा तिसराच गोलंदाज आहे.
विंडीजविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर बुमराहनं विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकांत सलग तीन गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली.
बुमराहनं 9.1 षटके गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकली. त्यानं 16 धावा देत विंडीजचे 6 फलंदाज तंबूत धाडले.
बुमराहनं चौथ्या षटकात ड्वेन ब्राव्हो, शमारा ब्रूक्स आणि रोस्टन चेज यांना बाद केलं. तिसऱ्या चेंडूवर ब्राव्हो झेलबाद झाला. त्यानंतर ब्रुक्स आणि रोस्टन चेज यांना पायचित केलं. ब्रूकने रिव्हू घेतला पण त्यात पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
बुमराहच्या आधी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी अशी कामगिरी केली आहे. हरभजन सिंगने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध 2006 मध्ये अशी कामगिरी केली होती.