भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, पण मुंबईचा मुलगा रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, पण उरलेल्या 4 खेळाडूंची निवड करताना कॅप्टन आणि कोचची डोकेदुखी वाढणार आहे.
रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये ओपनिंगची जबाबदारी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यावर असेल. मागच्या काही सीरिजपासून या दोघांनी बॅटिंगमध्ये धमाका केला आहे, त्यामुळे या दोघांना बाहेर ठेवणं अशक्य आहे. बांगलादेशविरुद्ध इशान किशनने द्विशतक केलं होतं, तर न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलनेही हीच कामगिरी केली होती.
विराट कोहली टीममध्ये असल्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरेल. मागच्या काही काळापासून विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही वर्षांपासून विराटची बॅट शांत होती, पण विराटने आधी टी-20 मग वनडे आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये शतक ठोकलं.
श्रेयस अय्यरला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो या सीरिजमधून बाहेर आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळेल.
हार्दिक पांड्या कर्णधार असल्यामुळे तोदेखील मैदानात उतरणार आहे. याशिवाय अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमी याचं टीममधलं स्थानही पक्कं आहे. मोहम्मद सिराजनेही मागच्या काही वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे तोही पहिली वनडे खेळताना दिसेल. वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया सिराजला तयार करत आहे.
टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे, यात एका स्पिनरच्या जागेसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यात टक्कर होईल. तर ऑलराऊंडरमध्ये अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. अक्षर पटेलने टेस्ट सीरिजमध्ये चांगली बॅटिंग केली असली तरी त्याला बॉलिंगमध्ये यश मिळालं नाही. तिसरा फास्ट बॉलर म्हणून उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एक जण खेळेल. तर एक स्थान शार्दुल ठाकूर किंवा केएल राहुल यांच्यातल्या एकाला मिळेल.