विदर्भात पर्यटनाची अनेक ठिकाणं आजही अनेकांना माहिती नाहीत. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी किमान एकदा तरी या ठिकाणांना भेट दिली पाहिजे.
मार्कंडा मंदिर : या मंदिराला विदर्भाची काशी, विदर्भातील खजुराहो असे म्हटले जाते. मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींच्या मूर्ती खजुराहोची आठवण करून देतात.वैनगंगा नदीच्या तीरावरील या मंदिराला पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिर हे नागपूरपासून 216 कि.मी. दूर आहे. या ठिकाणी मुख्य मंदिरासह आणखी 18 मंदिरं पाहण्यासारखी आहेत.
चंद्रपूर शहरातील अनेक प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक प्रमुख मंदिर आहे.पंधराव्या शतकातील हे मंदिर राणी हिराई यांनी बांधलं असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. या मंदिराच्या कुंडीतील पाणी औषधीयुक्त आहे, अशी श्रद्धा आहे.
चंद्रपूर येथील गोंडराजे राजा बिरशहा यांच्या निधनानंतर 'राणी हिराई' ने बांधलेली सुंदर वास्तू चंद्रपूरातून वाहणाऱ्या झरपट नदीच्या तीरावर आहे. एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एक अप्रतिम वस्तू कलेचा हा नमुना आवर्जून बघण्याजोगा आहे. येथे जवळच चंद्रपूर येथील भुईकोट किल्ला आहे.
चिखलदरा हे विर्दभातील महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात.चिखलदरा गावापासून अवघ्या 3 किमी अंतरावर गाविलगड किल्ला आहे. संपूर्ण किल्ला दोन भागात विभागलेला असून संपूर्ण किल्ला पहाण्यासाठी किमान एक अख्खा दिवस लागतो.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठी हे लासूरचे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी प्राचीन कलेचा अप्रितम नमुना आहे. 12 व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.
चंद्रपूररोडवरील भद्रावती येथे प्राचीन भक्कम बांधणीचा भांदक हा भुईकोट किल्ला आहे.गडाचे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीमध्ये आहे. काही जण याला भद्रावतीचा किल्ला म्हणूनही ओळखतात.